लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ, असं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. तसेच, धर्मा पाटील यांची ही आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेने केलेली हत्याच आहे, असा आरोप करत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर ठपका ठेवला.मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करणारे धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका मांडली. 'जमिनीचं चुकीचं फेरमूल्यांकन झाल्यानं मोबदला कमी मिळाल्याची पाटील यांची तक्रार होती. त्याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करत आहे. येत्या सात दिवसांत चौकशी पूर्ण होईल. १९९ हेक्टर जमीनीचे फेरमूल्यांकन करण्यात येईल,' असं बावनकुळे यांनी सांगितलं.'सानुग्रह अनुदान धर्मा पाटील यांच्या जमिनीसह अन्य जमीनधारकांना देता येईल का याची चाचपणी करण्याकरता अहवाल मागवला आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या जमिनींचं फेरमूल्यांकन २००९ ते २०१५ या काळात झालं असून त्याच काळात पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत बावनकुळे यांनी या प्रकरणाचे सर्व खापर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर फोडले.