नागपूर : जुनी पेंशन लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील शासकीय कर्मचारीसंपावर आहेत. शनिवारी संपाच्या पाचव्या दिवशी सुटी होती. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून आपल्या एकजुटतेचा परिचय दिला. या मोर्चात विविध विभागातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन एकच मिशन जुनी पेंशनचा नारा बुलंद केला.
राज्य सरकारीकर्मचारी मध्यवर्ती संघटना कृती समितीच्यावतीने शनिवारी दुपारी यशवंत स्टेडियम येथून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शासकीय कर्मचारी सहभागी झाले हाेते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, आयसीडीएम महाराष्ट्र राज्य कृती संघ, शासकीय मुंद्रणालय संघटना, शिक्षक संघा, कृषी महासंघ्, अखिल भारतीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा, धर्मदाय आयुक्त कार्यालय संघटना, मध्यवर्ती कारागृह संघटना, आरटीओ कर्मचारी संघटना,तंत्रशिक्षण विभाग, पाटबंधारे कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना,, वन विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका संघटना, पेन्शर्स संघटना, परिचारिका संघटना आदींसह विविध विभागातील संघटनांचे कर्मचरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधान चौकात या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महााराष्ट्र अध्यक्ष अशोक दगडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. सुधाकर अडबाले यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे नेते उपस्थित होते. यावेळी जुनी पेंशन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
सोमवारी थाळी नाद आंदोलन
संपाबाबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरू राहणार आहे. दरम्यान दुसऱ्या आठड्यातील आंदोलनाची रुपरेषाही कर्मचाऱ्यांनी यावेळी जाहीर केली. त्यानुसार साेमवारी २० मार्च रोजी संविधान चौकात थाळीनाद आंदोलन केले जाईल. २१ मोर्च रोजी काळे झेंडे दाखवले जातील. २३ तारखेपासून माझी पेंशन माझे कुटुंब हे अभियान राबविले जाणार आहे.
काही झाले तरी हटणार नाही, सरकारला इशारा
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी यावेळी सांगितले की, सरकार संपाबाबत तोडगा काढण्याऐवजी संघटनेत फूट पाडण्याचे काम करीत आहे. जुनी पेंशन लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. १९७७-७८ मध्ये कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसाचा संप पुकारला होता. त्याचा रेकॉर्ड आम्ही मोडू शकतो, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.