नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी अवैध रेती वाहतूक नागपुरात आणण्यासाठी ट्रक चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. काम्पा ते भिसी या मार्गावर सुपर एन्ट्री असल्याने ट्रक चालक व मोटार मालकही बिनधास्त असतात. पण उमरेड ते नागपूर दरम्यानच्या रस्त्यावर प्रशासन झोपी गेल्यावर भरधाव रेतीची वाहतूक करतात. ‘लोकमत’च्या पथकाने रेती चोरीचा हा खेळ कॅमेराबद्ध केला. या रेतीचोरीतून कोट्यवधी रुपयांचा सरकारचा महसूल बुडत आहे आणि अधिकाऱ्यांचे खिसे गरम होत आहेत.
नागपूर, भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट बंद असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटावरून रेती उचलली जात आहे. रेतीच्या या व्यवसायात रॉयल्टी ही केवळ नावाचीच राहिली आहे. फक्त रेतीची चोरी होत आहे. टिप्परच्या क्षमतेच्यावर रेतीची वाहतूक सुरू आहे. या चोरीला एसडीओ कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस निरीक्षक कार्यालय, आरटीओ, वाहतूक पोलिस, कुही फाटा चौकी अशा सर्वांचे पाठबळ मिळत आहे. या सर्वांचे एन्ट्री रेटही प्रति गाडी, प्रति महिना १० हजार रुपये ठरलेले आहेत. रेती चोरीचा हा सर्व प्रकार ‘लोकमत’च्या पथकाने मध्यरात्री उजेडात आणला.
काय टिपले कॅमेऱ्यात
रात्री १२ वाजता उमरेडकडून भिसीकडे जाणाऱ्या चौकात पोहोचलो. या चौकात भिवापूरच्या दिशेने बॅरिकेट लावलेले दिसले. त्यामुळे आम्ही भिसी मार्गाने काम्पाकडे निघालो. जे. बी. फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्याजवळ रेतीने भरून असलेल्या ट्रकांची रांग लागलेली होती. या रस्त्यावर संपूर्ण काळोख पसरलेला होता आणि ट्रकांचे लाईटसुद्धा बंद होते. काम्पाकडून रेती भरून येणारे ट्रक भिसी नाक्यापूर्वीच थांबून जात होते. त्यामुळे उमरेड-नागपूर रस्त्यावर रेतीच्या ट्रकची वाहतूक कमी झाली होती. दरम्यान, पोलिसांचे एक गस्ती पथक या रस्त्यावर दिसले. पोलिसांच्या वाहनामागे ओव्हरलोड रेती भरलेले ट्रकही होते. पण हे ट्रक सरळ नागपूरमार्गे निघून गेले. त्यानंतर सकाळपर्यंत प्रशासनाची कुठलीही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. याचा फायदा घेत पहाटे ४ नंतर ८० च्यावर ट्रक अचानक उमरेड-नागपूर रस्त्यावर दिसून आले.
सकाळी ७ नंतर पाचगाव, खापरी परिसरात
रेतीचे ट्रक शहरात शिरण्यापूर्वी कळमना, पाचगाव येथे ५० ते ६० च्यावर गाड्या थांबल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार हे ट्रक ड्रायव्हर लाईन क्लिअर होण्याची वाट बघत होते. विशेष म्हणजे कुही फाटा चौकीची या रस्त्यावरून पेट्रोलिंग होत असतानाही त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही.
रेती चोरीत दलाल सक्रिय
अवैध रेतीची वाहतूक होत असेल तर कारवाई करण्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. परंतु या विभागांना चूप करण्यासाठी डझनभर दलाल सक्रिय आहेत. ते प्रशासनाला मॅनेज करतात. प्रत्येक मार्गावर सुपर एन्ट्री मिळवून देण्यासाठी दलाल मोटारमालक व प्रशासनात मध्यस्थी करतात. विशेष म्हणजे या दलालांमध्येही एन्ट्रीवरून वर्चस्वाची लढाई आहे.
वाहतूक पोलिसही करतात दुर्लक्ष
या मार्गावर सामान्य वाहनांवर ग्रामीण वाहतूक पोलिस कारवाई करतात. पण रेतीची चोरी करणाऱ्या या ट्रकला, ओव्हरलोड रेती घेऊन जाणाऱ्या, नंबर प्लेटही नसणाऱ्या या टिप्परकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करतात. कारण एन्ट्री घेण्यात त्यांचाही विभाग सक्रिय असतो.