नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या गोवारी जमातीच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाने शिष्यवृत्ती नाकारली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नाही, असे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला असलेले गोवारी समाजाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विभागाच्या चकरा मारत आहेत.
प्रनिल दुधकवळे व प्रीतम कोहळे या गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे. दोघेही इंजिनीअरिंगला शिक्षण घेत आहेत. त्यांनी शिष्यवृत्तीकरिता महाविद्यालयाकडे अर्ज केले होते. परंतु प्रकल्प कार्यालयाने त्यांचे अर्ज रद्दबातल केले. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांना अभ्यासक्रमाचे लाखो रुपये शैक्षणिक शुल्क भरायला लावले. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाकडे विचारणा केली. परंतु शिष्यवृत्तीचे काम बघणारे संबंधित कर्मचारी सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. तिकडे महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येतो की नाही, यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिले संरक्षण
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण घेत असलेल्या गोवारी समाजाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी केली आहे.