नागपूर : एका तरुणीचा मोबाइल हिसकावून पळ काढणारे आरोपी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासामुळे पोलिसांच्या हाती लागले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली. पाच महिन्यांनंतर चोरट्यांना अटक करण्यात आली.
२५ सप्टेंबर रोजी पूनम कनोजे ही तरुणी संकल्पनगर येथील रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी मोबाइल हिसकावून पळ काढला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्ही, ई-सर्व्हेलन्स व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मोहम्मद समीर मोहम्मद शकील (२१, राऊतनगर) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने सलमान (२०) याच्यासोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून दोन मोबाइल जप्त करण्यात आले व त्याला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.