लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एकूण राजकीय स्थिती लक्षात घेता भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी ७३ लोकांनी एकूण ९७ अर्ज घेतले. मात्र केवळ एकाच अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. पुढील दोन दिवसात बहुतांश उमेवादर नामांकनपत्र दाखल करणार आहेत.
१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत नामांकनपत्र दाखल केले जाऊ शकते. मंगळवारपर्यंत या प्रक्रियेने वेग घेतला नव्हता. कॉंग्रेस व भाजपचे उमेदवार अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करणार आहेत. संदीप जोशी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करतील तर कॉंग्रेसचे अभिजित वंजारी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता अर्ज भरतील. बहुजन समाज पक्षाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
दरम्यान, कॉंग्रेसतर्फे मंगळवारी सायंकाळी अभिजित वंजारी यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी यासंबंधात पत्रक जारी केले. वंजारी यांनी याअगोदर पूर्व नागपुरातून कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचेदेखील त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.