लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा उद्या ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. मतमोजणीसाठी पूर्ण तयारी झाली असून प्रशासन सज्ज आहे. याासंदर्भात बुधवारी मतमोजणीचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) करण्यात आले. मानकापूर येथील क्रीडासंकुलात गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल राहतील.
सकाळी सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल. पोस्टल बॅलेट पेटीतील सर्व बॅलेट खाली करून डिक्लेरेशन व पोस्टल बॅलेट वेगवेगळे केले जाईल. डिक्लेरेशन नसल्यास, फाटले असल्यास, संशयित असल्यास ते वेगळ्या पेटीत ठेवण्यात येईल. नंतर त्यांची योग्य तपासणी करून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. नंतर एकूण मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहतील. त्यातील त्रुटीपूर्ण मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. या निवडणुकीत एकूण १९ उमेदवार असल्याने १९ पेट्या राहतील व त्रुटीपूर्ण मतपत्रिकेसाठी एक पेटी अशा २० पेट्या राहणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत २५ मतपत्रिकेचा एक गठ्ठा राहणार असून त्यावर चेकलिस्ट जोडण्यात येणार आहे.
पहिल्या पसंतीस प्राथमिकता
प्रथम पसंतीच्या मतास मतमोजणीत प्राधान्य देण्यात येऊन नंतर इतर पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. मतपत्रिकेत शब्दात पसंती लिहिणाऱ्या मतदार, पसंतीक्रम एकाच उमेदवारांच्या समोर १,२,३ असा क्रम लिहिल्यास ते मत अवैध समजले जाणार आहे.
मोबाईल-टॅबवर बंदी
मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल किंवा टॅब नेण्यास मनाई राहील. प्रत्येक टेबलवर बॅलेट पेटी राहील. एका टेबलवर चार जणांचे पथक राहील. यात काऊंटिंग सुपरवायजर, एसडीओ व डेप्युटी कलेक्टर दर्जाचे दोन अधिकारी यांचा समावेश राहील. यासोबतच काही पथक राखीवसुद्धा ठेवले जातील.