लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील यंदा विक्रमी मतदान झाले. मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३४.७० टक्के मतदान झाले होते. यंदा मतदारांची संख्या घटली असली तरी मतदानाची टक्केवारी २९.६८ टक्क्यांनी वाढली.
मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जारी करण्यात आली नव्हती. परंतु मतदानाचा आकडा ५५ टक्क्यांहून अधिक असेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या अपेक्षेहून पुढे जात मतदान झाले व मतदानाची अंतिम आकडेवारी ६४.३८ टक्के इतकी होती. एकूण पुरुष मतदारांपैकी ६९.४१ टक्के मतदारांनी मतदान केले तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५६.६२ इतकी होती.
गडचिरोलीत दुप्पट मतदान
मतदानाची सर्वाधिक टक्केवारी भंडारा जिल्ह्यात राहिली. तेथे ७२.५६ टक्के मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्यात ७२.३७ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये गडचिरोलीत ३५.८६ टक्के मतदान झाले होते. मागील वेळच्या तुलनेत यंदा तेथे मतदानाची टक्केवारी दुप्पट आहे. सर्वात कमी ६०.८८ टक्के मतदान नागपूर जिल्ह्यात झाले.
मतदानवाढीची कारणे काय
२०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८८ हजार ३२३ मतदारांपैकी १ लाख ७३ हजार जणांनी मतदान केले होते. ती टक्केवारी ३४.७० टक्के इतकी होती. यंदा नवीन नोंदणीत मतदारांची संख्या घटून २ लाख ६ हजार ४५४ इतकी झाली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९२३ म्हणजेच ६४.३८ टक्के मतदारांनी मतदान केले. यंदा मागील वेळच्या तुलनेत टक्केवारी व आकडा दोन्हीही वाढले. विविध उमेदवार व पक्षांनी यंदा नोंदणी झालेल्या मतदारांशी संपर्कावर जास्त भर दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांशी संपर्क सुरू होता. मतदानाच्या दिवशीदेखील त्यांना मतदान केले की नाही याची आठवण करून दिली जात होती. शिवाय सोशल मीडियावरदेखील प्रचार व जागृती दोन्ही सुरू होते. यामुळे यंदा मतदान वाढल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारांची धाकधूक वाढली
यंदा नव्याने नोंदणी झाली असूनदेखील मतदारांची संख्या घटली. त्यामुळे नेमके किती मतदान होते याकडे उमेदवारांचे डोळे होते. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. टक्केवारी वाढल्याने चुरसदेखील वाढणार असून आता निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदानाची टक्केवारी
जिल्हामतदान (२०२०) मतदान (२०१४)
नागपूर ६०.८८ % ३७.४७ %
भंडारा ७२.५६ % ४४.२७ %
गोंदिया ६३.६८ % ४३.७३ %
वर्धा ६५.३२ % २६.२७ %
चंद्रपूर ६७.४७ % ३२.१४ %
गडचिरोली ७२.३७ % ३५.८६ %
एकूण ६४.३८ % ३४.७० %
वर्षनिहाय मतदानाची टक्केवारी
वर्षमतदान
२००८ ५२ %
२०१४ ३४.७० %
२०२० ६४.३८ %