लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८व्या दीक्षांत समारंभाचे ऑनलाइन आयोजन शुक्रवारी (दि.९) करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात ७७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी मिळणार करण्यता येणार आहे, तर १०५ विद्यार्थ्यांचा विविध पदके-पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मागील दीक्षांत समारंभाच्या तुलनेत यंदा पदवी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बारा हजारांची वाढ झाली आहे. मागील नऊ वर्षांतील पदवीधरांची ही सर्वात जास्त संख्या आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अध्यक्षस्थान भूषविणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ऑनलाइनच उपस्थित राहणार असून, एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष उपस्थितीत राहता येणार नाही.
दीक्षांत सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभात ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. सोबतच विशेष दीक्षांत समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात येईल. ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने एकाही गुणवंत विद्यार्थी किंवा पीएच.डी. उमेदवाराला निमंत्रण देण्यात आलेले नाही.
१०६व्या दीक्षांत समारंभात ५४ हजार १४२, तर १०७व्या समारंभात ६४ हजार ९९३ विद्यार्थ्यांना पदवी मिळाली होती. यंदा त्यात १२ हजार ९१९ ने वाढ झाली आहे.
८६७ विद्यार्थ्यांना ‘पीएच.डी.’
यंदा चारही विद्याशाखा मिळून ८६७ विद्यार्थ्यांना ‘पीएच.डी.’ प्रदान करण्यात येणार आहे. यातील ६२९ उमेदवारांचे ऑनलाइन व्हायवा झाली. चार जणांचे व्हायवा तर विदेशातून झाली. ११ हजार ५१४ विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी दिली जाईल. ६५ हजार ३४५ विद्यार्थ्यांना स्नातक पदवी मिळेल. मागील वर्षीच्या तुलनेत ‘पीएच.डी.’ पदवीधरांची संख्यादेखील १२१ ने वाढली आहे.