लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक १ डिसेंबरला घोषित झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात होत असलेली ही पहिली निवडणूक असल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. विभागीय आयुक्तांकडून प्रशासकीय आढावे घ्यायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे.
विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती देतानाच, निवडणूक आयोगाकडून आलेल्या काही सूचना व मार्गदर्शनाबद्दलही माहिती दिली. कोरोनाचा विळखा असताना अख्ख्या निवडणूक प्रक्रियेत नियमांचे पालन कसोशीने करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मास्क, सॅनिटायझर, साबण, थर्मल स्कॅनर, ग्लोबज, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्वाचा भाग असल्याने त्यावर विशेष भर त्यांनी दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोनाचे नोडल ऑफिसर असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते.
रॅली, मेळावे, बैठकांना निर्बंध
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रॅली, मेळावे, बैठकांना निर्बंध घालण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्र भरतानाही उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तीला परवानगी आहे. डोअर टू डोअर प्रचार करतानाही फक्त पाच लोकांना परवानगी आहे.
हजार मतदारांमागे एक केंद्र
कोरोनामुळे यंदा निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. साधारणत: एक हजार मतदारांमागे एक बूथ राहणार आहे. गेल्या निवडणुकीत असलेल्या मतदान केंद्रापेक्षा किमान १० टक्के केंद्र वाढतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह व ८० वर्षावरील मतदारांसाठी पोस्टल बॅलेट
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांसाठी बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय ८० वर्षावरील मतदारांसाठी सुद्धा ही सोय आहे. पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल, याचे मार्गदर्शन अजूनही प्रशासनाकडे आलेले नाही.
अद्यापपर्यंत १८८२०८ मतदारांची नोंदणी
नागपूर पदवीधर मतदार संघासाठी आजपर्यंत १८८२०८ मतदारांनी नोंदणी केली आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत ११५२१० पुरुष तर ७२९४८ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक ८७०६५ मतदारांची नोंदणी नागपूर जिल्ह्यात झाली आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध साहित्य
एन-९५ मास्क - १३७६४८
थर्मल गन्स - ३०९४
सॅनिटायझर - ६६७८७ ( लिटर)
हॅण्डग्लोव्ज - २१४०००
फेसशिल्ड - २२६३०