नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात खरीप हंगामाच्या अखेरीस धान्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. जिल्हाबंदीमुळे अन्य जिल्हे तसेच अन्य राज्यांतून गव्हाची आवक कमी असल्याने भाव अचानक वाढले. त्यामुळे नागरिकांना धान्य जास्त भावात खरेदी करावे लागत आहे. कोरोना लॉकडाऊनचा परिणाम बाजारात दिसून येत आहे.
ऑक्टोबरमध्ये खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर सोयाबीनची आवक सुरू झाली. दिवाळीनंतर आवक अचानक वाढली. फेब्रुवारीमध्ये चना, मार्चमध्ये तूर आणि गव्हाची आवक सुरू झाली. कळमन्यात १२ खळे असून एका खळ्यात १८ ते २० अडतिये यानुसार जवळपास २५० धान्य अडतिये आणि २०० पेक्षा जास्त व्यापारी कार्यरत आहेत. सर्व अडतियांकडे सध्या चना आणि तुरीची आवक सुरू आहे. पण, कोरोनामुळे आवकीवर परिणाम झाला आहे. अडतिये म्हणाले, यंदा चना आणि तुरीची आवक एक महिन्यापूर्वीच सुरू झाली. दुसरीकडे चनाडाळ आणि तूरडाळीचे दर वाढल्याने कळमन्यात चना व तुरीचे भाव क्विंटलला अनुक्रमे ५३०० रुपये आणि ७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. १५ एप्रिलपर्यंत बाजारात आवक मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर कमी झाली. सध्या मध्य प्रदेशातून गव्हाची आवक बंद असल्याने गव्हाचे भाव प्रति क्विंटल ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. हॉटेल व रेस्टॉरंट बंद असल्याने चनाडाळीला मागणी कमी आहे. त्यामुळे बाजारात चन्याचे भाव कमीच आहेत. १५ मेनंतर वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनची दररोज आवक ८०० ते एक हजार पोत्यांची आहे. भाव ७ हजारांच्या उच्चांकावर गेले आहेत. मेनंतर आवक बंद होईल.
कोरोनामुळे आवकीवर परिणाम
कोरोना रुग्ण वाढत असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात माल आणणे कमी केले आहे. त्यामुळे काही धान्याचे भाव वाढले आहेत. १५ एप्रिलपर्यंत आवक चांगली होती. लॉकडाऊन हटल्यानंतर आवक वाढण्याची अपेक्षा आहे.
अतुल सेनाड, अडतिया व व्यापारी.
गव्हाचे भाव वाढले
मध्य प्रदेशातून मालाची आवक बंद असल्याने पंधरा दिवसांत गव्हाचे भाव प्रति क्विंटल ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. शिवाय चना आणि तुरीच्या भावातही वाढ झाली आहे. सोयाबीन व तांदुळाचे भावही वाढले आहेत.
- रमेश उमाठे, व्यापारी.
कोरोनामुळे बाजारात माल विक्रीसाठी आणणे बंद केले आहे. आठवड्यानंतर बाजारात माल नेणार आहे. सध्या भाव वाढल्याने फायदा होईल.
- झानेश्वर ठाकरे, शेतकरी.
बाजारात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याने आठवड्यापासून कळमन्यात माल नेला नाही. स्थिती सुधारल्यानंतर माल विक्रीसाठी नेणार आहे.
- कृष्णा आसोले, शेतकरी.
दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)
धान्य आवक भाव
तूर (गावरानी) २५०० ६५०० ते ७ हजार रुपये
चना ५ ते ६ हजार ५ हजार ते ५३०० रुपये
गहू ३ हजार २ हजार ते ३७०० रुपये
तांदूळ ५ हजार ३५०० ते ६ हजार रुपये
सोयाबीन ८०० ते हजार ६५०० ते ७ हजार रुपये