लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी धान्याची काळाबाजारी करणारा कुख्यात मदान याच्या फ्री ऑक्ट्रॉय झोनमधील एका गोदामावर छापा घालून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३८ टन तांदूळ जप्त केला. तेथून चार वाहनांसह सात आरोपींना ताब्यात घेतले. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यात पोलिसांनी यश मिळविल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने गोरगरिबांना मोफत तांदूळ उपलब्ध करून दिला. तर रेशन दुकानातून गरिबांना अल्प किमतीत तांदूळ दिला जातो. सरकारकडून मिळणारा हा तांदूळ विकत घेणाºया गोरगरिबांकडून सात ते आठ रुपये किमतीत आरोपी विकत घेतात. त्यासाठी गल्लोगल्ली गल्लाभरू व्यापाऱ्यांचे दलाल फिरतात. तो पॉलिश केल्यानंतर जास्त मागणी असलेल्या ब्रॅण्डच्या पोत्यात हा तांदूळ भरला जातो. त्यानंतर त्याची खुल्या बाजारात विक्री करून लाखो रुपये कमविणारे रॅकेट नागपुरात सक्रिय आहे.
अन्नधान्य वितरण प्रणालीतील काही भ्रष्ट मंडळींची त्यांना साथ असल्याने हे रॅकेट दरदिवशी लाखोंचे वारेन्यारे करतात. या रॅकेटमधील एक बडा मासा समजला जाणारा चेतन अर्जुन मदान आणि श्रीकांत रजनीकांत कक्कड यांच्या ९४/ १ क्रमांकाच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर तांदळाची हेराफेरी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी आपल्या सहकाºयांसह गुरुवारी सायंकाळी मदानच्या गोदामावर छापा घातला. पोलिसांनी तेथे रेशनच्या तांदळाची हेराफेरी केली जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तेथून ट्रक, ऑटो आणि दोन वाहनांसह ३८ टन तांदूळ जप्त केला. आरोपी चेतन अर्जुन मदान, श्रीकांत रजनीकांत कक्कड, उमेश बितेलाल शाहू, मोहम्मद रियाज मोहम्मद कदिर, अक्रम खान अहमद खान, प्रदीप प्रभाकर काजवे आणि विक्की गणेश जगदाळे अशा सात जणांना अटक केली.