लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सुरुवातीला पीक समाधानकारक असल्याने रामटेक तालुक्यात धानाचे उत्पादन चांगले हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, रेंगाळलेला परतीचा पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात झालेला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव यामुळे धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. उत्पादनखर्च वाढून उत्पन्न घटल्याने पीककर्जाची परतफेड करायची कशी, ही चिंता धान उत्पादकांना भेडसावत आहे.
यावर्षी धानाची राेवणी वेळेवर झाली. समाधानकारक पाऊस बरसल्याने पिकाची स्थितीही चांगली हाेती. ओलितासाठी पेंच जलाशयाचे पाणीही वेळेवर व मुबलक उपलब्ध झाले. शिवाय, बाजारात रासायनिक खतांची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पीक जाेमदार हाेते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वादळी पावसामुळे पीक जमीनदाेस्त झाले हाेते. त्यातच धानाचे पीक निसवायला सुरुवात हाेताच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला. उपाययाेजना करूनही तुडतुडे नियंत्रणात आले नाही. आपल्याला एकरी २० ते २२ क्विंटल धानाचे उत्पादन हाेण्याची आशा हाेती. मात्र, एकरी १० क्विंटल उत्पादन झाल्याचे हिवरा (भेंडे) येथील कमलेश वैद्य यांनी सांगितले. वादळी पावसामुळे धानाचे पीक जमीनदाेस्त झाल्याने तसेच फवारणी करूनही तुडतुडे नियंत्रणात न आल्याने उत्पादन घटल्याची माहिती महादुला येथील धनराज झाडे यांनी दिली.
---
एकरी १० क्विंटल उतारी
रामटेक तालुक्यात दरवर्षी धानाचे सरासरी २० क्विंटल उत्पादन हाेते. यावर्षी ते वाढण्याची आशा पल्लवित झाली हाेती. परंतु, परतीचा पाऊस व तुडतुड्यांचा प्रादुर्भावामुळे वास्तवात शेतकऱ्यांना धानाचे सरासरी एकरी १० क्विंटल उत्पादन झाले आहे. धानाला बाजारात चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी केवळ उत्पादन खर्च भरून निघाल्याचे सांगितले.
---
शासकीय धान खरेदी सुरू
राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. शिवाय, ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनसही जाहीर केला आहे. हा बाेनस किती क्विंटलपर्यंत दिला जाणार आहे, हे स्पष्ट न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, खुल्या बाजारात धानाच्या दरामध्ये तेजी आली आहे. परंतु, व्यापारी वेळेवर चुकारे देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.