लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : आदिवासी विकास महामंडळाच्या तीन धान खरेदी केंद्रांवरून २,२३३.२० क्विंटल धानाची अफरातफर करण्यात आल्याचे नुकतेच उघड झाले आहे. या प्रकरणात रामटेक पाेलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाच आराेपींना अटक केली. यातील काहींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहेे.
आराेपींमध्ये विशाल नामदेव नैताम, भास्कर पुरुषोत्तम मसराम (दाेघेही रा. रामटेक), रवींद्र भाऊराव उईके, नितीन कांतीलाल राके, रितेश सत्यजित मेश्राम (तिघेही रा. नागपूर) व बन्सी चैतू कोकोडे (रा. भंडारबोडी, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यातील भंडारबाेडी, हिवराबाजार व पवनी येथे धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या तिन्ही केंद्रांवर १ ऑक्टाेबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या काळात २,२३३.२० क्विंटल धान कमी आढळून आले हाेते.
हा धान चाेरीला गेल्याचे लक्षात येताच ज्ञानेश्वर चंद्रकांत चौधरी यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली हाेती. या प्रकरणात पाेलिसांनी सुरुवातीला बन्सी काेकाेडे यास अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे २१ सप्टेंबर २०२१ राेजी विशाल नैतामला अटक करण्यात आली. पाेलीस काेठडी काळ संपल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. त्यानंतर भास्कर मेश्राम व रितेश मेश्राम या दाेघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पाेलीस काेठडी सुनावली आहे.
नितीन राके या आराेपीचा एप्रिल २०२१ मध्ये मृत्यू झाला असून, अन्य एक आराेपी पसार असल्याने त्याचा शाेध सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने करीत आहेत.