नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने परिसराची धूळधाण केली. मुख्यत्वे धान्य बाजारात रस्त्यावर ठेवलेले धान्य अचानक भिजले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बाजार समितीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
शनिवारी सकाळी आकाशात ऊन होते. मात्र दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले आणि दुपारी ३.३० पूर्वी पावसाच्या हलक्या सरी येऊ लागल्या. तेव्हाच शेतकरी, अडतिया आणि व्यापाऱ्यांनी धान्य ताडपत्रीने झाकले. पण ३.३० नंतर तब्बल ३० मिनिटे आलेल्या मुसळधार वादळी पावसाने शेडबाहेर रस्त्यावर ठेवलेले आणि ताडपत्रीने झाकलेले हरभरे, तूरी आणि सोयाबीन भिजले. यामध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. त्यातच एका धान्य लिलावाच्या शेडवर निलगिरीचे झाड पडल्याने शेडचे नुकसान झाले.
धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे म्हणाले, पावसानंतर धान्याचा लिलाव बंद झाला, पण धान्याचे वजन करणे सुरू होते. सध्या बाजारात हरभरा, तूरी आणि सोयाबीनची आवक सुरू आहे. कळमन्यात दररोज हरभरा ५ हजारांहून अधिक पोते, तूर ३ हजार आणि सोयाबीन ५०० पोत्यांची आवक आहे. उन्हाळ्यात पावसाची चिन्हे नसल्याने बरेचसे धान्य शेडबाहेरच होते. धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.