जितेंद्र ढवळे, नागपूर : पंधरा दिवसांच्या राजकीय रणधुमाळीनंतर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी सकाळपासून दमदार मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 41 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. गावागावात मतदानासाठी तरुण वर्गात उत्साह दिसून येतो आहे.
३५७ ग्रा.पं.मध्ये सदस्यपदासाठी ६८८२ उमेदवार तर सरपंचपदासाठी एकूण ११८६ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ५ लाख ४८ हजार २९१ मतदार १२१६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. यात २ लाख ६५ हजार ३०२ महिला तर २ लाख ८२ हजार ९८७ पुरुष मतदारांचा समावेश आहे. पाच ग्रा.पं.ची पोट निवडणूक ८ मतदान केंद्रावर होत आहे. निवडणूकीसाठी जिल्ह्यात ५ हजार ४७३ निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ईव्हीएम बंद पडल्याने कुही तालुक्यातील ग्रा.पं.वडेगाव अंतर्गत नवेगाव देवी बुथवर सकाळी ८:१५ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.
- कुही तालुक्यात 22 ग्रा.पं.च्या निवडणुकीत 74 बुथवर सकाळी 11: 30 वाजेपर्यंत 26% मतदान
- रामटेक तालुक्यात सकाळी 11:30 वाजेपर्यंत 25: 53 टक्के मतदान झाले.
- मौदा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 11: 30 वाजेपर्यंत 29.98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
- कामठी तालुक्यातील 10 ग्रा.पं. साठी सकाळी 11 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान
कडेकोट पोलीस बंदोबस्त
ग्रा.पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 2 वाजतादरम्यान कळमेश्वर आणि भिवापूर तालुक्यात ग्रा.पं. निवडणूकीवरून दोन गटात वाद झाला होता.
यांची सरपंचपदी बिनविरोध निवड
भिवापूर तालुक्यातील सालभेट्टी (चोर) ग्रा.पं.च्या सरपंचपदी सुनंदा रामकृष्ण इरपाते तर झमकोली ग्रा.पं.च्या सरपंचपदी शारदा रमेश यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही ग्रा.पं.मध्ये सर्व सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. कळमेश्वर तालुक्यातील खैरी लखमा ग्रा.पं.च्या सरपंचपदी वर्षा सचिन निंबुळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मौदा तालुक्यातील आष्टी (नवे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी सीमा नेवारे यांची निवड झाली आहे. काटोल तालुक्यातील कातलाबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी अर्चना ललित खोब्रागडे तर वाजबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी सीमा सुरेश वाहणे यांची निवड झाली आहे. हिंगणा तालुक्यात मोहगाव (झिल्पी) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. येथे प्रमोद डाखले सरपंच असतील.