नागपूर : नागपूरसह विदर्भातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल समोर आले असून यात भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे. तथापि निकालाचे एकूण चित्र पाहता, महाविकास आघाडीच युतीच्या पुढे आहे. नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत १३७ जागी दमदार विजय मिळवीत भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला. महाविकास आघाडीने १६६, तर महायुतीने १५४ ग्रा. पं. त विजय मिळविला आहे.
अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात काँग्रेस प्रबळ ठरली आहे. गोंदिया तालुक्यातील माकडी ग्रामपंचायत तर आमगाव तालुक्यातील जांभूळटोला ग्रामपंचायतीत भाजपाने मुसंडी मारली असून भंडारा जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) क्षाने प्रथमच खाते उघडले आहे.
दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी!
नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत १३८ जागी दमदार विजय मिळवित भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला. भाजपपाठोपाठ काँग्रेस समर्थित गटाचे ११४ सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ५१, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) २, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) १८ तर इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांचे ३३ उमेदवार विजयी झाले आहेत.
बीआरएसने खाते उघडले
भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडुकीच्या माध्यमातून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने प्रथमच खाते उघडले आहे. मोहाडी तालुक्यातील सरपंच पदाच्या नऊ जागांवर विजय मिळविला. मोहाडी तालुक्यात एकूण ५७ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गटाने ३१ सरपंच पदावर दावा केला आहे. काँग्रेस समर्थीत गटाकडून सहा, तर भाजपकडून सात जागांवर दावा ठोकला जात आहे. पवनी तालुक्यातील पाच ठिकाणी तर तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे सरपंचपदासह सार्वत्रिक निवडणूक झाली. मतमोजणीनंतर पक्ष आपापल्या परीने आम्ही समर्थन दिलेले सरपंच निवडून आल्याचा दावा ठोकत आहे. परंतु एकंदरीत तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे प्राबल्य क्षेत्र असलेल्या (एनसीपी अजित पवार गट) गटाने सर्वात जास्त जागांवर विजयाचा झेंडा रोवल्याचे चित्र आहे.
काही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पॅनलचा बोलबाला
अमरावती जिल्ह्यात १९, वर्धा ६२ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात कॉंग्रेसने वर्चस्व राखले. काही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पॅनलचा बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी बाहेर येताच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. थेट सरपंच निवडणुकीत कॉंग्रेस अन भाजपच्या समर्थीत उमेदवारांनी गड राखले आहेत. शिवाय प्रहार अनु राकाँचाही सरपंच प्रत्येकी एका ठिकाणी विजयी झाला. काही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पॅनलने बाजी मारली आहे.
गोंदिया
गोंदिया तालुक्यातील माकडी ग्रामपंचायत तर आमगाव तालुक्यातील जांभूळटोला ग्रामपंचायतसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणीत गटाने बाजी मारली. माकडीच्या सरपंचपदी रंजीत बाबूलाल भालाधरे तर जांभूळटोलाच्या सरपंचपदी पिंकी राजेश जिंदाकूर निवडून आल्या आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील श्रीरामनगर येथील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ७) करण्यात येणार आहे.
वर्धा
वर्धा जिल्ह्यातील एकूण ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत महायुती समर्थीत सरपंच व सदस्य निवडून आले. जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींवर महायुती, ०८ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर ०२ ग्रामपंचायतीत अपक्षांनी गुलाल उधळला.
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा काँग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना गटाने तर तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. आठ ग्रामपंचायतीत संमिश्र निकाल राहिला.
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस तर तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजप समर्थक सरपंचपदावर निवडून आल्याचे दावे- प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून केले जात आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील काहाळी ग्रामपंचायतीत सरपंचपदी विजयी झालेल्या अश्विनी राऊत या कोणत्याही पक्षाच्या समर्थक नसल्याची माहिती आहे.
आता विधानसभेत २२४ जागा जिंकू - बावनकुळे
- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला समर्थित पॅनल्स आघाडीवर असल्यामुळे तीनही पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय तीनही पक्षांचे असून राज्य शासनाच्या कामाला जनतेने पावती दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
- आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेत महायुती ४५ हून अधिक जागा जिंकेल तर विधानसभेत सव्वादोनशे जागा जिंकू. त्यातील एकही जागा कमी येणार नाही. राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा आम्हाला मिळतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.