नागपूर : ग्रामपंचायत सदस्य ते जि. प. अध्यक्षा असा टप्पा गाठणाऱ्या जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे यांच्या पिपळा (डाकबंगला) येथे ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेसचा गट सत्ता कायम राखणार की परिवर्तन होणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
११ सदस्यीय पिपळा डाकबंगला ग्रामपंचायतमध्ये २०१७ च्या निवडणुकीत सरपंचासह काँग्रेस गटाचे ८ सदस्य विजयी झाले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या कल्पना गुणवंत तलमले यांनी १०८४ मते मिळवत अपक्ष उमेदवार पपिता संदीप तलमले यांचा पराभव केला होता. पपिता यांना ६५६ मते मिळाली होती. याशिवाय भाजप गटाच्या रेणुका मोरेश्वर सावरकर यांना ५४८ तर भाजपा बंडखोर योगीता ईश्वर वाठ यांना २१३ मते मिळाली होती. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या जि. प.च्या पोटनिवडणुकीत मुक्ता कोकुड्डे यांच्या बडेगाव सर्कलमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. मुक्ता यांचे पती विष्णू कोकुड्डे आणि गुणवंत तलमले हे माजी मंत्री आ. सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत.
कोकुड्डेच्या जागी धुर्वे
ग्रा. पं.च्या पोटनिवडणुकीत कोकुड्डे यांच्या रिक्त जागेवर दीपाली धुर्वे यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय कोविडमुळे मृत्यू झालेले वाॅर्ड क्रमांक ३ चे सदस्य गणपत सातपुते यांच्या रिक्त जागेवर अपक्ष संदीप तलमले यांचा २७८ मतांनी विजय झाला. त्यामुळे ११ सदस्यीय ग्रामपंचायतीत काँग्रेस गटाची सदस्य संख्या ७, भाजपा गटाचे दोन तर दोन अपक्ष सदस्य झाले. यावेळी सरपंचपद हे अनुसूचित जाती वर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी नवा चेहरा काँग्रेसला द्यावा लागणार आहे. याशिवाय गत पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या आधार पिपळ्याचे मतदार यावेळी काँग्रेस आणि जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे यांच्यावर किती विश्वास दाखवितात, ते २० डिसेंबर रोजी स्पष्ट होईल.
भाजपापुढे आव्हान
पिपळा डाकबंगला सावनेर तालुक्यातील महत्त्वाची ग्रा. पं. आहे. यावेळी भाजपाने ग्रा. पं. निवडणुकावर अधिक फोकस केला आहे. मात्र, पिपळ्यात मैदान मारण्यासाठी भाजपाला गावातील जातीय समीकरण लक्षात घेत पॅनल निश्चित करावे लागेल. याशिवाय विकासकामांचा पाढा वाचत यावेळी मैदान मारण्यासाठी काँग्रेसला गावातील असंतुष्टांनाही सामावून घ्यावे लागणार आहे.