नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील श्वेता ठाकरे (महल्ले) या प्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकेच्या मुखपृष्टावर झळकल्या आहेत. पंकज महल्ले व श्वेता ठाकरे-महल्ले या दाम्पत्याने सुरू केलेल्या 'ग्रामहित' या कंपनीची नोंद यावर्षी 'फोर्ब्स एशिया-१०० टू वॉच'च्या यादीत करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मासिकाने ठाकरे-महल्ले जोडीची दखल घेतल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.
फोर्ब्सने डिसेंबर महिन्याचा अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाच्या फ्रंट पेजवर ४ तरुण व्यावसायिकांसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे. या अंकात आशिया पॅसिफिक भागातील ११ क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देण्यात आली आहे. यात श्वेता ठाकरे आणि पंकच महल्ले या युवा शेतकरी दाम्पत्याच्या 'ग्रामहित' कंपनीचा समावेश आहे. पंकज-श्वेता दोघांनीही कार्पोरेट कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ग्रामहित कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरु केलं.
‘ग्रामहित’ काय करते?
पंकज महल्ले, श्वेता ठाकरे हे शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. तसेच साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धताही करून देतात. शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांचे शोषण थांबवून बाजार व्यवस्था सुलभ करणाऱ्यासाठी 'ग्रामहित' काम करते. ही सुविधा घरूनच मोबाईलवर क्लिकवरून दिली जात असून यामुळे वारंवार बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. यापूर्वी ‘ग्रामहित’ची अमेरिकेतील 'सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्वर चॅलेंज-२०२१'साठी निवड झाली होती.
गुंतवणूक, वित्त, विपणन अशा विविध विषयांवर विस्तृत माहिती आणि संशोधन प्रसिद्ध करणारे फोर्ब्स हे मासिक वर्षातून आठ वेळा प्रकाशित होते. यात तंत्रज्ञान, संप्रेशन,विज्ञान, राजकारण यासह विविध क्षेत्रांशी आणि विषयांशी निगडीत माहिती प्रसिद्ध केली जाते. या मासिकात नाव येणे प्रतिष्ठेचे मानले जात असून यात प्रसिद्ध होणारे लेख व माहितीची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाते. त्यामुळे या मासिकात नाव यावं अशी अनेकांची इच्छा असते मात्र ते वाटतं तितकं सोपं काम नाही. 'फोर्ब्स' यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहितचाही समावेश होता. पंकज-श्वेताच्या कामाची दखल घेत फोर्ब्सने त्यांना मूखपृष्ठावर स्थान दिलं असून निवडक १०० कंपन्यांमध्ये ग्रामहितची निवड करण्यात आलीये. यामुळे जिल्ह्याचा लौकिक वाढलाय.