शिवाजी जोंधळे : आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान नागपूर : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आतापर्यंत अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडली आहे. इंदिरा आवास योजना असो की स्वच्छ भारत अभियान, नागपूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आम्ही केवळ मॉनिटरिंग करण्याचे काम करीत असून, गावाच्या विकासाचा खरा ‘हिरो’ हा ग्रामसेवक असल्याचे गौरवोद्गार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काढले. नागपूर जिल्हा परिषदेच्यावतीने रविवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. काटोल रोडवरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर होत्या. मंचावर अतिथी म्हणून शिक्षण सभापती उकेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.यानंतर जि.प.अध्यक्षा निशा सावरकर व जोंधळे यांच्या हस्ते एकूण ९५ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार प्रदान करून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जोंधळे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे सुरू झाली आहेत. पूर्वी ज्या गावांमध्ये राजकीय पुढारी असेल, तेथेच ग्रामपंचायत भवन किंवा स्मशानभूमी तयार होत असे. परंतु आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायत भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात जिल्ह्यातील १७१ गावांत ग्रामपंचायत भवन बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गावांच्या विकासासाठी भरपूर निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो निधी योग्य कसा खर्च होईल, याची ग्रामसेवकांवर जबाबदारी वाढली आहे. ग्रामसेवकांना अत्यंत पारदर्शकपणे काम करावे लागणार आहे. नरेगाच्या माध्यमातून सध्या १६५ गावांमध्ये काँक्रिटच्या रोडचे काम सुरू झाले आहे. अशाप्रकारे भविष्यात नागपूर जिल्हा एक विकासाचे चांगले मॉडेल ठरू शकते, असा आशावाद त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)आदर्श पुरस्काराचे मानकरी विशेष म्हणजे, मागील १० वर्षांपासून आदर्श ग्रामसेवक या पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमात मागील २००५-०६ ते २०१३-१४ पर्यंत या पुरस्कारासाठी निवड झालेल्या ९५ ग्रामसेवकांना तो प्रदान करण्यात आला. यात प्रामुख्याने एम. झेड़ देशमुख, आर. आर. रहाटे, एस. बी. केचे, हितेंद्र फुले, रतन शृंगारे, किशोर अलोणे, प्रमोद वऱ्हाडे, बाबूराव कठाणे, गुणवंता चिमोटे, शैलेंद्र टेंभूर्णे, एन. जी. शेळके, व्ही. जी. मस्के, पी. के. लोलूसरे, दिलीप टेंभेकर, छात्रपाल पटले, एस. पी. पिसे, चिंतामण बेलेकर, शरद मुंगे, देवेंद्र खडसे व एम. आर. भोयर यांच्यासह आदींचा समावेश होता.
ग्रामसेवकच गावाच्या विकासाचा खरा ‘हिरो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2016 2:38 AM