आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्ये याबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच संविधानाची ओळख करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, तसेच विविध संस्था व संघटनांच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर रोजी भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. संविधान सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संविधान दिन तसेच जागृती अभियानाअंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी ए.बी.केदार, सहायक आयुक्त विजय वाकुलकर, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय.आर. सवई, नागपूर विद्यापीठाच्या एनएसएसचे प्रमुख डॉ.अनिल बनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.संविधान दिनानिमित्त शहरातील विविध अशासकीय संस्था व संघटना तसेच शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, एनएसएस आदी विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमीते संविधान चौक अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. संविधान चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये भारतीय संविधान हे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारासोबत संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये पथनाट्य, लेझिम, संविधानाबद्दल संपूर्ण माहिती असलेले फलक, आदींचा समावेश राहणार आहे.संविधान दिनासोबत संविधान सप्ताहानिमित्त संपूर्ण जिल्हाभर तसेच विविध शाळांमध्ये संविधान जागृतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबतच संविधान प्रतिष्ठानतर्फे विशेष पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येईल. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान संविधानातील प्रमुख तरतूद, संविधानाला अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये, संविधानाने दिलेली नागरिकांची कर्तव्ये याबद्दल या सप्ताहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी संविधान पोस्टर स्पर्धा, संविधान गौरव काव्य स्पर्धा, संविधान घोषवाक्य स्पर्धा, संविधान रॅलीदरम्यान चित्ररथ स्पर्धा, लघुचित्रपट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धामध्ये जिल्हा परिषद, क्रीडा विभाग, उपसंचालक शिक्षण, राष्ट्रीय सेवायोजना आदींचा सहभाग राहणार आहे.