नरेश डोंगरे !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर गळ्यावर खोलवर घाव बसल्याने वृद्ध आजी शेवटचे आचके देत होती तर तिची हत्या करवून घेणारी नात थंड डोक्याने आजीच्या कम्बरेला दोऱ्याने बांधलेला चाव्यांचा गुच्छा सोडवत होती.
एखाद्या सिनेमातील वाटावा असा हा प्रकार एमआयडीसीतील विजयाबाई तिवलकर नामक वृद्धेच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासातून उघड झाला आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणाऱ्या मिनूने (काल्पनिक नाव) सख्ख्या आजीचे १५ लाख लुटण्यासाठी हे अमानुष हत्याकांड घडवून आणल्याचे कळल्याने समाजमन सुन्न आहे.
मुलीची मुलगी म्हणून विजयाबाईचा तिची नात मिनूवर खूप जीव होता. त्यामुळे तिच्यावर ती बराच खर्च करीत होती. कपडे, मोबाईल, छानशौकासाठी तिला ती नेहमी पैसे द्यायची. ''खुल्या विचारांची'' मिनू तिच्या मित्रांसोबत स्वैर जगत होती. सामान्य आईबाप टोकत असल्याने तिने फेब्रुवारी महिन्यात आपले घर सोडले होते. फैजान सोबत ती राहत होती. आजी विजयाबाईला नातीची खूपच चिंता होती. त्यामुळे ती मिनूला नेहमी पैसे द्यायची. स्वतःच्या घरात ठेवून तिचे खाणे-पिणेही करायची. जिच्यावर जीव लावला तीच आपला जीव घेईल, असा विजयाबाईंनी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणूनच घटनेच्या मध्यरात्री (१३ मे) जेवण करून झोपल्याचे सोंग करणारी मिनू जेव्हा दार उघडून बाहेर गेली तेव्हा तिने फ़क्त कुठे गेली होती, एवढेच तिला विचारले. थंड रक्ताच्या मिनूने दार उघडून आपल्या पाच साथीदारांना आजीच्या घरात घेतले आणि आजीला मात्र ''फ्रिजमध्ये बर्फ जमला होता. तो फेकायला बाहेर गेली होती'', असे सांगितले. त्यानंतर १० मिनिटांतच नातीचे क्रूर रूप विजयाबाईला बघायला मिळाले. ती तोंडावर उशी दाबत असल्याचे पाहून दणकट विजयाबाईने तिला झटक्यात बाजूला सारले. यानंतर नातीच्या रूपातील वैरी तिच्या साथीदारांसह विजयाबाईवर तुटून पडले. त्यांनी तिच्या गळ्यावर अनेक घाव घातले. ती रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे आचके देत असताना आरोपी नात आजीच्या कंबरेला करदोड्यात बांधून असलेल्या चाव्याचा गुच्छा काढत होती.
यावेळी जखमी आजी आणि नात या दोघींचेही हात रक्ताने माखलेले होते. त्या हातानेच आजीला मृत्यूच्या दाढेत ढकलत मिनूने आजीचे अवघे घर अस्ताव्यस्त केले. दहा ते पंधरा लाख रुपये मिळणार, असा तिचा गैरसमज होता. तिच्या हाती मात्र २७ हजार रुपये, सोन्याचा गोफ, दोन अंगठ्या आणि चांदीचे काही दागिने लागले.
---
आरोपी भांडले
मिनू, फैजान, बाबा, नीलेश आणि अजहर आणि आरजू हे सर्व झिरो माइलजवळ आले. तेथे त्यांनी पैसे मोजले. दहा ते पंधरा लाखांच्या लालसेपोटी एका वृद्धेची कट रचून हत्या केल्यानंतर मिनूने त्यांना केवळ २३०० रुपये दिले. त्यामुळे आरोपी चिडले होते. त्यांच्यात त्यावरून वादही झाला. यावेळी ''जो हुवा उसे भूल जावो'', असे सांगून मिनूने स्वतःचा मोबाईल स्वीच ऑफ करतानाच साथीदारांना त्यांचे मोबाईल बंद करण्यास भाग पडले. आपले लोकेशन दिसणार नाही आणि पोलीस आपल्याला पकडणार नाही, असा तिचा गैरसमज होता; मात्र या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विवेक मासाळ यांनी सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आणि जीव लावणाऱ्या आजीचा जीव घेणाऱ्या मिनू तसेच तिच्या साथीदारांचा छडा लावला.
---
कटू आठवणी
प्रियकर तसेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने रक्ताच्या नातेवाईकाची अमानुष हत्या करण्याचे गुन्हे नागपुरात यापूर्वीही घडले आहेत. वाडीतील एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली होती. त्याचप्रमाणे नरेंद्र नगरातील तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन स्वतःचे वडील प्राचार्य वानखेडे यांची हत्या करवून घेतली होती. मिनूच्या कुकृत्यामुळे या घटना पुन्हा आठवणीला आल्या आहेत.
---