लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. गरिबांच्या वस्त्यांमध्ये अन्नधान्याचे वाटप होत असले तरी अनेक वस्त्यांमध्ये नुकतीच जन्माला आलेली बरीच बाळं आहेत. त्यांच्या कपड्यांसाठी पालक चिंतित झाले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन आपले वय व हातातील काठीची तमा न बाळगता त्यांनी एक संकल्पच घेतला. ८५ व्या वर्षाच्या वयात त्यांनी चक्क पंचविशीच्या वयातील जिद्द दाखवत शंभराहून अधिक तान्हुल्या बाळांची झबली शिवून दिली. सुमती लिमये असे त्यांचे नाव असून त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणावाटच निर्माण केली आहे.लॉकडाऊनमुळे कपड्यांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठीचे कपडे विकत घेण्याची कुठलीच सोय राहिलेली नाही. या कालावधीत अनेक लहान मुलामुलींचे जन्म झाले; मात्र गरीब वस्त्यांमध्ये तान्हुल्या बाळांसाठी कपड्यांची कमतरता भासत होती. यासंदर्भात राष्ट्रसेविका समितीकडून पुढाकार घेण्यात आला व त्यांनी शहरातील विविध लोकांनी यात मदत करावी यासाठी फोन लावले. सुमती लिमये यांनादेखील असा फोन गेला व तातडीने त्यांनी या कार्यासाठी होकार दिला. काही दिवसांपूर्वी त्या पडल्या होत्या व त्यामुळे त्यांना काठीचा आधार घेऊन चालावे लागत आहे. परंतु तरीदेखील त्यांनी जिद्द दाखविली व हे काम पूर्ण करुन दाखविण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. त्यांनी कपडे शिवण्याची मशीन काढली व घरात मिळतील तसे कपडे घेऊन छोटी छोटी झबली व दुपटी शिवून दिली. विशेष म्हणजे हे काम करत असताना त्यांनी स्वच्छता व सॅनिटायझेनशची पूर्ण काळजी घेतली. शिवणकाम करताना त्या पूर्ण वेळ मास्क लावूनच होत्या. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना शिवणकाम करण्याचा अनुभव असून आजवर त्यांनी गरजूंसाठी अनेकदा पुढाकार घेतला आहे हे विशेष.
८५ व्या वर्षी आजींची प्रेरणादायी जिद्द; तान्हुल्यासाठी शिवली शंभराहून अधिक झबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 8:42 PM
८५ व्या वर्षाच्या वयात त्यांनी चक्क पंचविशीच्या वयातील जिद्द दाखवत शंभराहून अधिक तान्हुल्या बाळांची झबली शिवून दिली. सुमती लिमये असे त्यांचे नाव असून त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणावाटच निर्माण केली आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात जपला सामाजिक भाव