लोकमतमुळे जुळले तुटलेले बंध : आई-बाबा गेले कुठे ? नागपूर : मंगळवारी एका निरासग मुलीला तिची आई नरखेड तालुक्यातील पिपळा (के.) ग्रामपंचायतमध्ये सोडून निघून गेली होती. दुपारपर्यंत तिच्या आई-वडिलांचा सुगावा न लागल्याने नरखेड पोलिसांनी अनाथालयात दाखल करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षात आणले होते. गुरुवारी तिला बालकल्याण समितीपुढे हजर करून अनाथालयात सुपूर्द करण्यात येणार होते. गुरुवारी लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे तिचे आई-वडील परतले नाही, मात्र आजी-आजोबांना ही बातमी कळल्यावर त्यांनी थेट नागपुरात धाव घेऊन चिमुकलीचा ताबा मिळविला. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळलेल्या आईने या चिमुकलीला गावातील ग्रामपंचायतीत सोडून पलायन केले होते. पोलिसांना ही बाब कळल्यानंतर मुलीला नागपुरात हलवून, त्यांनी आई-वडिलांचा शोध घेतला. मुलीच्या घरचा पत्ता मिळाल्यानंतर नरखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर धवड हे तिच्या घरी पोहोचले. वडील दारूच्या अवस्थेत होते, आईचा पत्ता नव्हता. बालकल्याण समितीने केले प्रबोधन नागपूर : वडिलांना मुलीची ओळख होती, परंतु तो ठेवायला तयार नव्हता. त्यानंतर पोलीस तिच्या आजी-आजोबांकडे गेले. आजी-आजोबालाही समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही थकते वय लक्षात घेऊन नकारच दिला. शेवटी किशोर धवड हतबल झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना नागपुरात मुलीला बालकल्याण समितीपुढे हजर करायचे होते. गुरुवारी लोकमतने चिमुकलीचे आई-वडील गेले कुठे? या आशयाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर आजी-आजोबाला अनेकांकडून विचारणा झाली. वृत्तपत्र हातात घेतल्यानंतर हळव्या झालेल्या आजी-आजोबांनी लगेच पोलीस कर्मचारी किशोर धवड यांना फोन करून आम्ही नागपूरला येतो, असे सांगितले. पोलिसांसोबत आजी-आजोबा दोघेही बालकल्याण समितीपुढे हजर झाले. बालकल्याण समिती व बालसंरक्षण कक्षातर्फे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. समितीपुढे या चिमुकलीची आजी-आजोबांनी जबाबदारी स्वीकारली.
चिमुकलीला आजी-आजोबाचा आधार
By admin | Published: July 29, 2016 2:48 AM