मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्य सरकारतर्फे दहावीनंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या भरवशावर लाखो मागासवर्गीय विद्यार्थी शिकले. उच्च शिक्षण घेतले. अनेकांनी परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आपले व देशाचे नाव उज्ज्वल केले; परंतु या शिष्यवृत्तीच्या निधीला लावण्यात आलेली कात्री आणि शिष्यवृत्ती मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची संख्या कमालीची रोडावलेली आहे. काही वर्षांपर्यंत तब्बल पाच लाखांवर विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत होते; परंतु यावर्षी लाभार्थ्यांची संख्या केवळ साडेपंधरा हजारांवर आली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांची ही प्रचंड रोडावलेली संख्या पाहता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण संकटात असून, भविष्य अंधारात असल्याचे दिसून येते.
गेल्या दहा वर्षांत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसंदर्भात आर्थिक तरतूद, खर्च कमी कमी होत आला आहे. परिणामी लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. २०१५-१६ मध्ये ५ लाख ७९ हजार २७४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यावर्षी ८११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि खर्च ८१० कोटी रुपये झाला होता. त्यानंतर मात्र आर्थिक तरतूद झाली; पण प्रशासकीय उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचत नसल्याने या योजनेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी-कमी होत गेली. यावर्षी तर परिस्थिती अतिशय भयावह आहे. आर्थिक तरतूद ३७५ कोटी रुपयांची करण्यात आली; परंतु आतापर्यंत केवळ ३८-७५ कोटी रुपयेच खर्च झाले आणि १५,६२९ इतके लाभार्थी आहेत. सरकार काेणत्याही पक्षाचे असो शासकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लाभार्थ्यांची संख्या रोडावली असून, त्यांचे भविष्य अंधारात बुडाले आहे.
गेल्या दहा वर्षांतील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची राज्यातील परिस्थती (रुपये कोटीमध्ये)
वर्ष आर्थिक तरतूद झालेला खर्च एकूण लाभार्थी विद्यार्थी
२०११-१२ ६१६.७६ ६१४.१७ ४,१६,४८५
२०१२-१३ ७६२.८० ७६२.४८ ४,८३,३८७
२०१३-१४ ८४४.४१ ८४३.७१ ३,९६,२९६
२०१४-१५ ७९०.०० ७८७.९४ ३,४२,१०८
२०१५-१६ ८११ ८१०.९८ ५,७९,२७४
२०१६-१७ १०१७.५३ १०१७.५० ४,३५,२९२
२०१७-१८ ८८७.९० ८८३.४७ २,२७,४८०
२०१८-१९ १५२५ १३३२,६२ ३,०९,२८२
२०१९-२० १७१७.२० १०५३.३८ २,६६,०१३
२०२०-२१ ३७५ ३८.७५ १५,६२९