नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये जनजागृती घडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामसंवादातून जनजागृती साधत अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटून मार्गदर्शन केले आणि गैरसमज दूर करून लसीकरण वाढविण्यावर भर दिला.
रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामभेटीतून प्रबोधन, वृक्षलागवड, पथनाट्य, जनजागृती, क्षेत्रीय भेटी साधण्यात आल्या. प्रत्यक्ष संवादावर भर देऊन गावकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. रामटेक तालुक्याअंतर्गत नवरगाव फुलझरी पुनर्वसन, संग्रामपूर पुनर्वसन, पुसदा पुनर्वसन, आरोग्य केंद्र हिवरा बाजार, करवाई, बेलदा आश्रमशाळा तसेच पारशिवनी तालुक्यात किरंगीसर्रा गावांना भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार योगेश कुंभेजकर, उपवन संरक्षक शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत गावांमध्ये भेटी देऊन पहाणी करण्यात आली. यात शाळा व आश्रमशाळांना भेटी, जनसंपर्क, वृक्षलागवड, लसीकरण मार्गदर्शन, पाणी, स्वच्छता, शंकासमाधान, वैयक्तिक स्च्छता, परिसर स्वच्छता, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांच्या आणि भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य शांताबाई कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भूयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अनिल किटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हेमके यांच्यासह अन्य अधिकारी तसेच रामटेक व पारशिवणीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.