सावनेर/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका सावनेर, हिंगणा, कामठी, कळमेश्वर, नागपूर ग्रामीण आणि काटोल तालुक्याला बसला आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत आतापर्यंत (वर्षभरात) ४९ हजार ८४८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच १११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारीही ग्रामीण भागात ११०९ नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर १९ जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा ग्रामीण भागाला फारसा फटका बसला नाही. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ग्रामीण भागात संक्रमण अधिक वाढले. आता गाव तिथे रुग्ण, अशी स्थिती निर्माण झाली.
जिल्ह्यात सावनेर तालुक्यात संक्रमणाचा वेग अधिक आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१७ कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात रोज सरासरी २८३ नागरिक बाधित होत आहेत. त्यामुळे मृत्यूदरही वाढला आहे. तालुक्यात आतापर्यंत १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर शहरानजीकच्या नागपूर ग्रामीण तालुक्यात संक्रमण साखळी अधिक घट्ट झाली आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यात आतापर्यंत ७४०८ नागरिकांना कोरानाची लागण झाली आहे. १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात रोज सरासरी १६६ नागरिक बाधित होत आहेत.
औद्योगिक नगरी असलेल्या हिंगणा तालुक्यात बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात आतापर्यंत ६२३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कामठी तालुक्यात आतापर्यंत ५२१४ नागरिकांना कोराेनाची लागण झाली आहे. येथे १८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत दहा दिवसांत तालुक्यात ९५१ रुग्णांची भर पडली.
काटोल तालुक्यात आतापर्यंत ४२९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत दहा दिवसांत येथे ७८० रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यातही संक्रमण अधिक आहे. येथे आतापर्यंत ४२८५ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात दिवसाकाठी ५० नागरिक बाधित होताना दिसत आहेत.
उमरेड तालुक्यात २१२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे गत दहा दिवसांत ४५५ रुग्णांची भर पडली.
रामटेक तालुक्यात आतापर्यंत २००१ नागरिक बाधित झाले आहे. ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत दहा दिवसांत तालुक्यात ४३७ रुग्णांची भर पडली.
नरखेड तालुक्यात ग्रामीण भागात संक्रमण साखळी अधिक घट्ट झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १९६० रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पारशिवणी तालुक्यात आतापर्यंत ३७८० नागरिक संक्रमित झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत दहा दिवसांत तालुक्यात ९०५ रुग्णांची भर पडली आहे.
मौदा तालुक्यात आतापर्यंत १२१५ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत दहा दिवसांत १५२ रुग्णांची भर पडली आहे.
कुही तालुक्यात १४३१ नागरिक संक्रमित झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे गत दहा दिवसांत सरासरी १४३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. भिवापूर तालुक्यात आतापर्यंत ४८३ नागरिक बाधित झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात गत दहा दिवसांत १२६ रुग्णांची नोंद झाली.
---
येथे मृत्यूचे प्रमाण अधिक
सावनेर शहर, धापेवाडा, काटोल शहर, नरखेड शहर, रामटेक शहर, नांदगाव, भोवरी, कन्हान, पारशिवणी, वाडी शहर, कुही शहर, उमरेड शहर, वानाडोंगरी, भिवापूर शहर, महादूला, कोराडी.
--
हे आहेत हॉटस्पॉट
सावनेर तालुका : सावनेर शहर, दहेगाव, चनकापूर, वाकी, वाघोडा, पाटणसावंगी, खापरखेडा.
कळमेश्वर तालुका : धापेवाडा, कळमेश्वर, ब्राह्मणी, मोहपा गोंडखैरी, तेलकामठी.
नागपूर ग्रामीण तालुका : वाडी, दवलामेटी, खापरी, बुटीबोरी.
हिंगणा तालुका : वानाडोंगरी, डिगडोह देवी, हिंगणा, टाकळघाट, निलडोह.
काटोल तालुका : काटोल शहर, कोंढाळी, पारडसिंगा, रिधोरा, कुकडी पांजरा, कलंबा, मुकणी.
नरखेड तालुका : मदना, मायवाडी, पिपळा केवळराम, साखरखेडा, सिंजर, थाटूरवाडा, नरखेड, मोवाड.
रामटेक तालुका : रामटेक, पंचाळा बु., मनसर, देवलापार, परसोडा, उमरेड तालुका : उमरेड शहर, वायगाव घोटूर्ली.
कामठी तालुका : कामठी शहर, महादुला, कोराडी, येरखेडा, रनाळा.
मौदा तालुका : भोवरी, धनी, निमखेडा, नांदगाव.
पारशिवणी तालुका : कन्हान, पारडी, पारशिवणी, तामसवाडी, ईटगाव, डोरली, कांद्री, सोनेगाव.
कुही तालुका : हरदोली (नाईक), हरदोली (राजा), सोनपुरी, आकोली, मेंढेगाव, मांढळ.
भिवापूर तालुका : भिवापूर शहर
--
नागरिकांनी नको तिथे गर्दी केली, नियमावलींकडे दुर्लक्ष केले, यामुळेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. प्रारंभी अनेकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. आता जनजागृतीमुळे अधिकांश नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. लसीकरणानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. संदीप धरमठोक,
तालुका आरोग्य अधिकारी, उमरेड
--
मधल्या काळात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने विवाह-सोहळे आणि कार्यक्रमांच्या गर्दीकडे दुर्लक्ष केले. नियमांचे पालन झाले असते, तर ग्रामीण भागातील आता उद्भवलेली परिस्थिती टाळता आली असती.
राहुल तागडे, सोनपुरी, ता. उमरेड