आंतरजातीय विवाह योजना : लाभार्थ्याच्या समाजकल्याण विभागात येरझाऱ्यालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी १.५० कोटी रुपयांची आर्थिक मदत ३०८ लाभार्थ्यांना देण्यात आली. एका जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करुन दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या दाम्पत्याच्या बॅँक खात्यात ५० हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. परंतु या योजनेतील एका लाभार्थ्यांला प्रशासनाच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षाचा फटका बसला आहे. वर्षभरापूर्वी या लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले . तेव्हापासून लाभार्थी समाजकल्याण विभागाच्या येरझाऱ्या मारत आहे. संतोष राजेश्वर दलाल असे लाभार्थ्याचे नाव असून, तो उमरेड येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाला अर्ज केला होता. २०१६ मध्ये त्याला अनुदान मंजूर करण्यात आले. परंतु त्याला अद्यापही अनुदान मिळाले नाही. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते योजनेचे अनुदान त्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. परंतु त्याच्या बँक खात्यात अशी कुठलीही रक्कम जमा झालेली नाही. अर्ज करताना दलाल यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उमरेड शाखेचा अकाऊंट नंबर जोडला होता. परंतु विभागातर्फे त्यांना सांगण्यात आले की, अनुदान हे युको बँक सिर्सी येथील खात्यात जमा करण्यात आले. परंतु लाभार्थ्याचे या बँकेत खातेच नाही. विभागाच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात गेलेले अनुदान त्याला मिळावे, या मागणीसाठी तो विभागाच्या चकरा मारत आहे. जि.प.चे सदस्य शिवकुमार यादव यांनी २२ डिसेंबर २०१६ ला याप्रकरणात लेखी तक्रार केली होती. परंतु अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
दुसऱ्याच्या खात्यात जमा केले अनुदान
By admin | Published: June 09, 2017 2:38 AM