लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. मेडिकलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) न्युओनेटल व्हेंटिलेटर बंद पडले. यावर असलेल्या पाच बालकांना श्वास घेणे कठीण झाले. याची दखल तातडीने डॉक्टरने घेतली. पाचही बालकांना ‘अम्बु बॅग’वर घेतले, यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, हा विभाग तब्बल सहा तास अंधारात होता.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) वीज खंडित होणार नाही याच्या दक्षतेसाठी मेडिकलचा स्वत:चा विद्युत विभाग आहे तर रुग्णालयलाला वीज पुरवठा करणाºया कंपनीनेही वीज खंडित होणार नाही यासाठी विशेष सोय केली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन मोठ्या जनरेटरची सोयही आहे. परंतु शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने कुठल्या सोयी आणि कुठली दक्षता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.‘पीआयसीयू’मधील रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक वीज गेली. १० मिनिटांतच डॉक्टर व परिचारिकांची धावपळ सुरू झाली. ‘पीआयसीयू’च्या आत नातेवाईकांना जात येत नाही. यामुळे दाराबाहेर नातेवाईकांची गर्दी वाढली. याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाच्या एक-एक नातेवाईकांना आत घेतले. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेली मुले जोरजारोत श्वास घेत असल्याचे तर काहींच्या तोंडातून फेस निघत असल्याचे दिसून आले. नातेवाईकांची रडारड सुरू झाली. डॉक्टर व परिचारिकांनी तातडीने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ‘बॅग व्हॉल्व मास्क व्हेंटीलेशन’ म्हणजे ‘अम्बु बॅग’वर टाकले. रात्रभर एका हाताने रबरी जाड फुगा दाबून, कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागला. रात्री ३.३० च्या सुमारास वीज आली आणि पुन्हा खंडित झाली. नंतर वीज आली ती थेट ८ वाजतानंतरच. डॉक्टरांच्या तत्परतेने मुले वाचली, असेही नातेवाईक म्हणाले.या संदर्भात बालरोग विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. गोल्हर यांना विचारले असता, त्यांनी रात्री वीज खंडित झाल्याचे व रुग्णांना ‘अम्बु बॅग’वर हलविण्यात आल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. परंतु अधिक माहितीसाठी त्यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना विचारा असे स्पष्ट केले.