नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नागपूर-विदर्भातील १०० गायकांनी सलग १० तास गायन करून ‘ग्रेट इंडियन बुक रेकॉर्ड’मध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, हा रेकॉर्ड झाल्याचे जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सलग १०५ तासांचे गायन करून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करणारे सुपरिचित गायक सुनील वाघमारे यांच्या संकल्पनेतून डॉ. दंदे फाउंडेशन तसेच पद्मश्री मोहम्मद रफी सांस्कृतिक मंचातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, नीलेश खांडेकर यांच्या उपस्थितीत या ‘रेकॉर्ड’ची सुरूवात करण्यात आली. नागपूर विदर्भासह ठिकठिकाणचे शंभरावर गायक-गायिका आणि वादक कलावंत या विक्रमासाठी सभागृहात उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता १०० वे गाणे पूर्ण होताच ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’कडून उपस्थित असलेले इंद्रजीत मोरे यांनी हा रेकॉर्ड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
पद्मश्री डॉ. विकास महात्मे, दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, पार्श्वगायक एम. ए. कादर, मध्य भारतातील सुप्रसिद्ध गिटारिस्ट भोला घोष, उस्ताद अकील अहमद खान, डॉ. प्रवीण महाजन, पराग भावसार, सुनील ठोंबरे, मनोज ठक्कर, गुलाबचंद जांगिड, नरेंद्र सतीजा आणि आनंद शर्मा, परिणिता मातुरकर यांच्या हस्ते हा रेकॉर्ड नोंदविणाऱ्या गायक, गायिकांना प्रमाणपत्र तसेच मेडल प्रदान करण्यात आले.