ठळक मुद्दे४४ मिनिटे रक्ताविना होते शरीररुग्णाला मिळाले जीवनदान
आॅनलाईन लोकमतनागपूर : हृदयाच्या महाधमनीला असामान्य सूज आल्याने रुग्णाला वेदना आणि श्वास घेण्यास अडचण जात होती. कार्डिओ थोरॅसिक सर्जन डॉ. समीत पाठक यांनी त्यांना तपासल्यावर धमनी रक्ताच्या गुठळ्यांनी भरली होती. तर काही ठिकाणी कॅल्शियम साचले होते. महाधमनीतील स्पंदन छातीला हात लावला तरी अनुभवता येत होते. ही महाधमनी (अॅन्युरिझम) अचानक फुटली तर जीवाला धोका होता. यामुळे नागपूरच्या रामनगर येथील भरत बोबडे या ४३ वर्षीय रुग्णाला हृदयात तीव्र वेदना व श्वास घेण्यास अडचण जात होती. त्याची तपासणी व काही चाचण्या केल्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. डॉ. पाठक यांनी सांगितले, हृदय शस्त्रक्रियेमध्ये उर उघडणे ही सामान्यपणे पहिली पायरी असते. परंतु या रुग्णाबाबतीत असे करणे शक्य नव्हते. कारण हृदयातील महाधमनीची सूज (स्यूडो अन्युरिझम) उरोस्थीला (छातीच्या बरगड्या) खालून स्पर्श करीत हाती आणि अशा स्थितीत उर उघडल्यास महाधमनी लगेच फुटण्याची शक्यता होती. यामुळे ही शस्त्रक्रिया ‘डीप हायपोथर्मिक सर्क्युलेटरी अरेस्ट’ या विशिष्ट तंत्राने करण्यात आली. या प्रक्रियेत रुग्णाच्या उजव्या मांडीतील उर-धमनी आणि उर-शीरा या दोन्हीतून ‘कॅन्युला’ (नळी) टाकण्यात आली. रुग्णाला ‘कार्डिओ पल्मोनरी बायपास’ यंत्रावर ठेवण्यात आले. शरीराचे तापमान ३६ डिग्रीपासून सुरू करून हळूहळू १८ डिग्री सेल्सियसपर्यंत नेण्यात आले. या तापमानावर हृदय स्पंदन थांबते आणि आंकुचन होते. ही प्रक्रिया होताच शरीरातील रक्ताभिसरण पूर्णपणे थांबविण्यात आले. रुग्णाच्या शरीरातील संपूर्ण रक्त ‘हार्ट लंग’ यंत्रातील ‘व्हिनस रिझर्व्हायर’मध्ये साठविण्यात आले. रक्त पुरवठ्याच्या अभावामुळे होणाऱ्या क्षतीपासून मेंदूचे संरक्षण करण्यासाठी सगळी काळजी घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे धमनीतील रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. महाधमनीचा चढता भाग नीट करण्यात आला. उर धमनीतून रक्तप्रवाह सुरू करण्यात आला. रुग्णाला पुन्हा उष्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शरीराचे तापमान सामान्य होताच हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू झाले. रक्ताभिसरण बंद असण्याचा कालावधी ४४ मिनिटे होता. हळूहळू मेंदूच्या मज्जासंस्थेत सुधारणा झाली. रुग्णाला इस्पितळातून सुटी देण्यात आली. या शस्त्रक्रियेत न्यूरोलॉजिस्ट डॉ. केतन चतुर्वेदींनी मदत केली.