लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच काही आजार असलेल्यांना कोविड-१९ या आजाराचा जास्त धोका आहे. यामध्ये मोठी संख्या हृदयरोगींची आहे. हृदयरोग असलेल्यांना सामान्यांप्रमाणेच कोविडच्या संसर्गाचा धोका आहे. तो होऊ नये म्हणून सर्वसामान्यांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड प्रत्येक अवयवावर परिणाम करतो त्याची जास्त बाधा फुफ्फुसाला तर त्या खालोखाल हृदयाला धोका असतो. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ज्ञ डॉ. पंकज हरकूट आणि कन्सल्टन्ट इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. सोहल पराते यांनी केले.महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शनिवारी पंकज हरकूट आणि सोहल पराते यांनी कोविड आणि हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन केले.२७ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे. यावर्षी ‘हृदयरोग स्वत: समजून घ्या, इतरांनाही समजवून सांगा’ अशी थीम आहे. हृदय आणि त्याविषयीच्या आजाराविषयी आपण सर्वांनी जागरूक होणे आवश्यक असल्याचे पंकज हरकूट म्हणाले.सोशल मीडियामुळे संभ्रम व भीतीत भरकोरोनाचे संकट जसजसे वाढत आहे तसे यासंबंधीची भीती, अफवा आणि संभ्रमही वाढत आहे. त्यात भर सोशल मीडियाने घातली आहे. कोविडसंबंधी अनेक संदेश फिरतात. थेट कोविडची औषधेच सांगतात. अशाप्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा काहीही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा, असे आवाहन केले.‘हॅपी हायपोक्सिया’विषयी सजग राहाशरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी होणे म्हणजे हॅपी हायपोक्सिया. ऑक्सिजनची मात्रा कमी होणे हे अत्यंत धोकादायक आहे. शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनची गरज असते. ‘हॅपी हायपोक्सिया’मुळे हृदयविकाराचा जास्त धोका असतो. अचानक खोकला वाढणे, अचानक घाम येणे, जोरजोरात श्वास ही हॅपी हायपोक्सियाची लक्षणे आहेत. त्यामुळे कुठल्याही लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सोहल पराते म्हणाले.