लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील ग्रीन बस संचालनातील अडचणी दूर करून ग्रीन बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी दिल्ली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या ग्रीन बसेस पुन्हा शहरातील रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.नितीन गडकरी यांचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प असलेल्या ग्रीन बसची सेवा मागील ११ दिवसापासून बंद आहे. बस संचालनातील अडचणी सोडविण्यासाठी दिल्ली येथे परिवहन भवनात गडकरी यांच्या अध्यक्षतेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन बस संचालन करणाऱ्या स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने जीएसटी सवलत, पार्किग सुविधा व एस्त्रो खाते उघडण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रीन बसला लागणारे इथेनॉल जीएसटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रीन बसच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी खापरी येथे नऊ एकर तर वाडी येथे सहा एकर जागा उपलब्ध केली जाईल. येथे ट्रान्सपोर्ट हब ‘बीओटी’ तत्त्वावर उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ट्रान्सपोर्ट हब (बसपोर्ट) मध्ये हॉटेल, रेस्टारंट, स्कूटर, सायकल तसेच इतर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात येईल. त्यासोबतच ग्रीन बसेसला रात्री पार्किंग करण्यासह देखभाल, दुरुस्तीसाठीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.या प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पाचा विस्तृत आराखडा सादर करण्याचे आदेश गडकरी यांनी महापालिकेला दिले आहेत. योजनेतील एकूण खर्चापैकी ६० टक्के रकमेची खासगी आॅपरेटर्सनी गुंतवणूक करावी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.नागपूर शहरात चार बस आॅपरेटर आहेत. त्यांच्यासाठी वेगळे खाते उघडण्यात येईल. तिकिटांचे पैसे थेट या खात्यात जमा होतील. यातून ग्रीन बसला इंधनासाठी निधी उपलब्ध केला जाईल. बस आॅपरेटरला रोख पैसे देऊन डिझेल खरेदी करावे लागते, यासंबधी देखील सकारात्मक तोडगा काढला जाईल. ग्रीन बस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने तो बंद पडू देणार नाही, अशी माहिती गडकरी यांनी दिली.बैठकीला स्कॅनिया कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याबाबत गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाºयांना विचारणा केली. परंतु अधिकाºयांनी यावर उत्तर दिले नाही. परंतु यावेळी स्वीडनचे राजदूत क्लास मोलीस उपस्थित होते. ग्रीन बसवर तोडगा काढण्यात आला. बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.दिल्ली येथील बैठकीत ग्रीन बसबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. जीएसटी सवलत, पार्किगची व्यवस्था व इंधनासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपूर शहरात ग्रीन बस पुन्हा धावतील.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी