निर्माणकार्य सुरू : परिसर करणार सुशोभितलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात गतीने साकारत असलेल्या मेट्रो रेल्वेचे प्रत्येक स्थानक हे आगळेवेगळे राहणार आहे. यातच वर्धा मार्गावरील कृपलानी टी-पॉइंट येथे होणारे राहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन हे पूर्णपणे हिरवेगार राहणार आहे. वर्धा रोडवर मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूने टी-पॉइंटपर्यंत निर्माण कार्य केले जात आहे. राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाच्या निर्माण कार्याच्या वेळी नागरिकांना त्रास होऊ नये या उद्देशाने नीरीकडून येणाऱ्या मार्गाची रुंदी वाढविण्यात येत आहे. राहाटे टी-पॉइंटच्या दोन्ही बाजूला हिरवागार परिसर आहे. या स्थानकावरून मेट्रो रेल्वे ही अजनी रेल्वे स्टेशनच्या जवळील मेट्रो स्थानक येथे पोहोचणार आहे. टी-पाइंटपासून अजनी स्टेशनपर्यंत मेट्रो रेल्वेचा प्रवास हा खूप सुशोभित राहणार आहे मोठ-मोठ्या हिरव्यागार झाडांच्या मधून जाणारी मेट्रो काही वेळेकरिता जंगलाचा आभास निर्माण करेल. मेट्रो रेल्वे राहाटे कॉलनी स्थानक ते अजनी स्टेशनपर्यंतच्या प्रवासादरम्यान अंदाजे २८ टक्के क्षेत्र हिरवेगार करण्यात येणार आहे. राहाटे कॉलनी स्टेशन निर्माण कार्याच्या वेळी हिरव्या रंगाच्या काचेचा उपयोग केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने हे स्टेशन ‘ग्रीन मेट्रो’च्या संकल्पनेला साकार करण्यात येईल. राहाटे कॉलनी स्टेशनटे बांधकाम ५७९७.६९ वर्ग मीटर क्षेत्रामध्ये केले जात आहे. सर्व सोयी-सुविधायुक्त हे स्थानक नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्याकरिता सहाय्यक ठरेल. परिसराच्या भौगोलिक स्थितीचे अध्ययन करून महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी या परिसराला हिरवाईने परिपूर्ण राहण्याच्या सोबतच स्थानकाला हिरवेगार बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्याच आधारावर स्टेशनचे डिझाइन बनविण्यात आले आहे. आय.टी.आय.,अंधविद्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, राहाटे कॉलोनी तसेच इतर क्षेत्राचे शासकीय कार्यालय, सार्वजनिक कार्यालय तसेच रहिवासी कॉलनीतील नागरिकांना या स्थानकाचा लाभ मिळेल. वर्धा मार्गावरून येणाऱ्या रस्त्यावरील प्रवाशांकरिता सध्या राहाटे कॉलनी चौक हा केंद्रबिंदू बनला आहे. राहाटे कॉलोनी टी-पॉइंट या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे स्टेशन बनल्यानंतर या परिसराला अधिक महत्त्व राहणार आहे.
राहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनला ‘ग्रीन लूक’
By admin | Published: June 20, 2017 1:49 AM