लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनेही हिरवी झेंडी दिली आहे. यामुळे आता नागपूर शहरापुरती असलेली मेट्रो रेल्वे ही वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेडपर्यंत जाईल. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. आता लवकरच हा प्रकल्प खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरेल. सर्व व्यवस्थित राहिले तर दीड वर्षात मेट्रो रेल्वे ब्रॉडगेजवर धावायला लागेल.
या प्रकल्पात एकूण २६८.६३ कि.मी.चे चार कॉरिडोर असतील. या प्रकल्पावर जवळपास ३०५.१८ कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी खासगी गुंतवणूकदारांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. नागपुरात होणारा ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प राहील. गुंतवणूकदारांद्वारे रेल्वे खरेदी करून त्या ब्रॉडगेज ट्रॅकवर चालविण्याच्या अपेक्षेसह गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे वर्धा, नरखेड, रामटेक व भंडारापर्यंत ही ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे चालविण्यात येणार आहे. अजनी स्टेशनवरून ती चालविण्यात येईल. वर्धाचे अंतर ७८.८ कि.मी. आणि १२ स्टेशन, नरखेड ८५.५३ कि.मी. आणि ११ स्टेशन, रामटेक ४१.६ कि.मी. आणि ८ स्टेशन व भंडारा ६१.७ कि.मी. व ११ स्टेशन राहतील.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर तीन कोच असलेल्या दहा मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रुटवर चालविण्यात येतील. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर मेट्रो रेल्वेची संख्याही ३० पर्यंत वाढविली जाईल. कोचची संख्याही वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या प्रकल्पात तिकिटाच्या रकमेत महामेट्रो आणि भारतीय रेल्वे यांचा वाटा कसा राहील, हे निश्चित झालेले नाही.