राकेश घानोडेनागपूर : अंबाझरी तलावालगत असलेल्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या जागेवर १४ व १५ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे कार्यक्रम आयोजकांना दिलासा मिळाला.
याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आठ हजार चौरस फुट जागा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, आयोजकांना ही जागा १५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रिकामी करून द्यावी लागेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या जागेसह एकूण २० एकर जमीन मे.गरुडा अम्युझमेंट पार्क कंपनीला ३० वर्षांच्या लीजवर दिली आहे. सध्या ही जमीन कंपनीच्या ताब्यात आहे. त्यामुळे न्यायालयाने कंपनीला या कार्यक्रमास परवानगी देण्यासंदर्भात विचारणा केली असता, कंपनीने कार्यक्रमाला विरोध केला नाही व यासाठी आठ हजार चौरस फुट जागा देण्याची तयारी दर्शविली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता हा निर्णय देऊन संबंधित याचिका निकाली काढली. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, यासाठी डाॅ.आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी याचिका दाखल केली हाेती. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. समितीच्या वतीने ॲड. शैलेश नारनवरे व ॲड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.