नागपूर : नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. दूरपर्यंत त्याची ख्याती आहे. नागपुरी संत्र्यांचा गोडवा कायम असतानाच आता शेतकरी मोसंबीकडेही वळला आहे. या लिंबूवर्गीय पिकाकडे मागील काही काळात शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली फळगळ शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पाडणारी ठरली आहे.
निंबूवर्गीय फळामध्ये समाविष्ट होत असलेल्या मोसंबीने सध्या नागपुरातील फळ बाजाराला चकाकी आणली आहे. निंबापेक्षा आकाराने मोठी आणि संत्र्यापेक्षा लहान असे मोसंबीचे रूप असले तरी आता नव्या कलमांतून आणि नव्या संशोधनातून मोसंबीच्या फळांचा आकार आणि गोडवाही वाढला आहे. निर्यातीच्या दृष्टीने संत्र्याएवढीच आता मोसंबीलाही मागणी येत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे वाढला आहे.
आरोग्याच्या दृष्टीनेही मोसंबीचे महत्त्व अधिक आहे. व्हिटॅमिन सी चे तत्त्व यात असल्याने आणि आहारात घेताच थेट रक्तात मिसळत असल्याने इम्युनिटी बूस्टर म्हणूनही या फळाकडे बघितले जाते. बाजारात खोऱ्याने मोसंबीची आवक होत असून, कामगार उत्तम मोसंबी निवडत असतानाचे हे दृश्य मनाला ताजेपणा प्रदान करतात.
नागपूर जिल्ह्यातील फळबागांमध्ये संत्र्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. २०२०-२१ या वर्षात संत्र्याचे लागवड क्षेत्र २६,२३३.५४ हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र घटून १९,८५३.६० हेक्टरवर आले आहे. त्यापाठोपाठ मोसंबीचे क्षेत्र आहे. ६,०५७ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी यंदा ४,३४१.३८ हेक्टरवर मोसंबीच्या बागा उभ्या आहेत. यातून संत्र्याचे १,३२,५५३.८५ मे. टन तर मोसंबीचे उत्पादन ३१,९०३.५५ मे. टन उत्पादन अपेक्षित आहे.
का झाली घट?
मागील दोन वर्षांत झालेला अवकाळी पाऊस, होणारी फळगळ आणि सरकारकडून मिळणारे अल्प नुकसान भरपाई यामुळे अलीकडे ही घट दिसत आहे. संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना उत्तम दर्जाच्या आणि रोगमुक्त कलमा उपलब्ध करून देण्याचे काम येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेकडून होत असते. मात्र, या कलमांची किंमत अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे मत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानही मोठे आहे.
क्षेत्रफळ
फळबागा एकूण : ३३,५१७.०३ हेक्टर
आंबा बागा : ५२०.७५ हेक्टर
चिकू बागा : १७५.५० हेक्टर
संत्रा बागा : २६,६२२.५४ हेक्टर
मोसंबी बागा : ६,०५६.०२ हेक्टर
पेरू बागा : १४२.२२ हेक्टर