नागपूर : लग्नाचा हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. वर्ष २०२३ मध्ये २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत केवळ १३ शुभमुहूर्त आहेत. या दिवसात सभागृह, लॉन आणि हॉटेल्समध्ये शेकडो लग्नकार्य होणार आहेत. या निमित्ताने लोकांची खरेदीही जोरात सुरू असून कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. लग्नकार्याची ९० टक्के खरेदी ऑफलाईन होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सराफांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
एका लग्नकार्यामुळे ५० हून अधिक व्यावसायिकांची उलाढाल होते. लग्नकार्य सभागृह, लॉन, हॉटेल्स, कॅटरर्स, फोटोग्राफर, टेलर, कापड व्यापारी, किराणा, फूल विक्रेते, ब्रॅण्ड, घोडाबग्गी, इव्हेंट मॅनेजमेंट आदींसह अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे लग्नाच्या शुभमुहूर्ताची सर्वच व्यावसायिकांना प्रतीक्षा असते. नागपूर ब्रॅण्ड असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात चांगली बुकिंग झाली आहे. नागपुरात नावाजलेल्या २० ब्रॅण्ड पार्टी आहेत. बुकिंगमुळे त्यांनी नवीन ड्रेसेस आणि वाद्य आणले आहेत. सध्या २५ ते ३० हजार रुपये प्रति तास या दराने बुकिंग होत आहे.
या दिवसात फोटोग्राफर आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या उत्पन्नात भर पडते. लग्नकार्यात प्री-इव्हेंट व लग्नकार्याचे फोटो आणि व्हिडिओचे किमान १ ते ३ लाखांपर्यंत आकारले जातात. शिवाय इव्हेंटमध्ये संगीताच्या तालावर वधूचा डोलीतून मंडपात प्रवेश आदींसह अन्य इव्हेंटचे हजारो रुपये घेण्यात येतात. या सर्वांचे काम इव्हेंट कंपनीला मिळते. तसेच फेटा आणि मंडपाचेही बुकिंग होत आहे.
नागपूर हॉल अॅण्ड लॉन ओनर असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, लग्नासाठी शुभदिनाचे बुकिंग झाले आहे. यंदाच्या हंगामात लग्नकार्यात सभागृह आणि लॉन मालकांना चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. लग्नाचे थाली पॅकेज ४०० ते १ हजार रुपयांपर्यंत आहेत. पंडित किशोर शास्त्री म्हणाले, २३ नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी आहे. त्यानंतर स्वाभाविकपणे लग्नकार्य सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात २३, २४, २५, २७, २८, २९ तर डिसेंबर महिन्यात ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १५ या तारखांना लग्नाचे मुहूर्त आहेत.