लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे. तर नाला खोलीकरणामुळे कोहळा रिठी या शिवारातील सुमारे १२५ एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ झाला. त्याचप्रमाणे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी व नाल्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शाश्वत सिंचनासाठी वापर करण्यासाठी मौजा खापरी (मोरे) ग्रामपंचायत अंतर्गत कोहळा (रिठी) या गावात योजना राबविण्यात आली. कोहळा रिठी या शिवारातून जाणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले असून जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे येथे ३६३.८१ ‘टीसीएम’ जलसाठा निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्यातीलच मौजा खापरीमध्येदेखील जलयुक्त शिवार अंतर्गत विविध कामे करण्यात आली. येथील लोकांनादेखील मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.शेतकरी शेतातील पिके वाचविण्यासाठी जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनापासून तर लोकसहभाग मिळविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ अधिकारी संजय भगत, सुरेश मलघडे, कृषी पर्यवेक्षक विराज देशमुख व सहायक निरंजन गहूकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच कोहळा रिठीचे शिवार जलयुक्त झाले आहे.
सोयाबीन झाले दुप्पटजलयुक्तमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यातून याच परिसरातील २० शेतकऱ्यांनी विजेच्या मशिनीद्वारे आपल्या शेतापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन दुप्पट झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आमचे उत्पादन जास्त झाले असल्याची माहिती टाकळघाट येथील शेतकरी विजय राजबिंडे, गजानन सावरकर यांनी दिली.