नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी रक्तदान शिबिराच्या उपक्रमांतर्गत येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नागपूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला. ५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी या शिबिरात रक्तदान केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता शिबिराला प्रारंभ झाला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भंडारा येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक शिवाजीराव पदमने, नागपूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, जीएसके रक्तपेढीचे संचालक डॉ. आशिष खंडेलवाल, डॉ. श्वेता खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होते. चौधरी म्हणाले, रक्तदान ही समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे. ‘लोकमत’ने कोरोनाच्या काळाचा व्यापक विचार करून राज्यभर ही मोहीम उघडून खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते पटवून दिले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हे औचित्य साधून हा उपक्रम यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
रक्तपेढीचे डॉ. खंडेलवाल यांनी रक्तदानाबद्दल मार्गदर्शन केले. संचालन आणि उपस्थितांचे आभार कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे यांनी मानले. यावेळी गोंदियाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सचिन खोडे, वरिष्ठ खोदन अभियंता शैलेश रंगारी, सहायक कनिष्ठ भूवैज्ञानिक नंदू कनोजे, सारंग मुळे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजय भुसारी यांनीही शिबिराला भेट दिली. यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे प्रेम व्यास यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.