राऊत, चतुर्वेदी अनुपस्थित : मोहन प्रकाश, चव्हाणांनाही एकजुटीत अपयश नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिवशीही काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांची पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमातील गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. एकजुटीने महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे आवाहन करणारे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना स्थानिक नेत्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यात अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गटबाजी अशीच कायम राहिली तर पक्षाचे कसे होणार, अशी चिंता कार्यकर्ते व्यक्त करीत होते. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीवरून माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिले असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. या मुद्यावरून त्यांच्या समर्थकांनीही शहर काँग्रेसच्या एकाही बैठकीला हजेरी लावलेली नाही. यातून चतुर्वेदी-राऊत एक गट आणि मुत्तेमवार, अनिस अहमद-विकास ठाकरे असा दुसरा गट असे चित्र निर्माण झाले आहे. गटबाजीतून नागपुरात गांधी जयंतीचे दोन कार्यक्रम झाले. मुत्तेमवारांनी व्हेरायटी चौकात तर राऊत-चतुर्वेदी यांनी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम घेतला. नोटाबंदीवरील आंदोलनेही वेगवेगळी झाली. देशपांडे सभागृहात नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून माजी मंत्री विलास मुत्तेमवार, अनिस अहमद व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची नावे वगळण्यात आली होती. शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांची नावे टाकण्यात आली. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी येतील अशी अपेक्षा होती. मात्र, तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात तीन मिनिटांसाठीही हे दोन्ही नेते आले नाही. याची एकच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी राऊत व चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी) चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे या गटबाजीकडे लक्ष वेधले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी एकजूट दाखवा. दोन वर्षे जोमाने काम करा. लोकसभा व विधानसभाही जिंका, असे आवाहन केले. चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन नेमके कुणासाठी होते, असा प्रश्न या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पडला.
काँग्रेसच्या स्थापना दिवसातही गटबाजी
By admin | Published: December 29, 2016 2:36 AM