लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपातील १५१ सदस्यात काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक आहेत. त्यामुळे काहिही झाले तरी काँग्रेसचा महापौर बसू शकत नाही. असे असतानाही काँग्रेसमध्ये महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पुन्हा गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बुधवारी काँग्रेसतर्फे मनोज गावंडे व रमेश पुणेकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले. उपमहापौर पदासाठी रश्मी धुर्वे यांनी तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी अर्ज दाखल केला. १०८ नगरसेवक असल्याने भाजपला आव्हान देणे शक्य नाही. परंतु काँग्रेसमधील गटबाजीमुळे उमदेवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच ही निवडणूक चर्चेचा विषय झाली आहे.
भाजपतर्फे महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांनी तर उपमहापौर पदासाठी मनिषा धावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बसपातर्फे महापौर पदासाठी नरेंद्र वालदे यांनी तर उपमहापौर पदासाठी वैशाली नारनवरे यांनी अर्ज दाखल केला. मनपातील १५१ नगरसेवकांपैकी भाजपचे १०८, काँग्रेस २९, बसपा १०, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक व एक अपक्ष सदस्य आहे. दोन पदासाठी आठ उमेदवारांनी १६ अर्ज दाखल केले आहेत.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महाविकास आघाडीकडून गावंडे व गवरे यांची उमेदवारी निश्चित करून याबाबतचे पत्र मंगळवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविले. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गणेश पाटील यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांना पत्र पाठवून महापौर पदासाठी उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी काँग्रेस नगरसेवकांची बुधवारी दुपारी १२ वाजता महापालिकेत बैठक बोलाविली होती. मात्र, वनवे यांच्या नेतृत्वात गावंडे यांनी उमेदवारी दाखल केल्याची माहिती ठाकरे समर्थकांना मिळताच, ठाकरे समर्थक नगरसेवक तातडीने मनपा मुख्यालयात पोहचले. रमेश पुणेकर व रश्मी धुर्वे यांची नावे निश्चित करून याची विकास ठाकरे यांना कळविण्यात आली. या घडामोडीमुळे पुन्हा गटबाजी चव्हाट्यावर आली.
पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल तो मान्य
महाविकास आघाडीतील एकजूट असल्याचा संदेश देण्यासाठी उमेदवार दिला आहे. परंतु पक्षश्रेष्ठी आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते
बैठक घेऊन एकमताने निर्णय घेऊ
प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर अध्यक्ष उमेदवारीचा निर्णय घेतात. ही सामान्य प्रक्रिया आहे. पत्र मिळाल्यानंतर उमेदवार निश्चित केला. यात वादाचा विषय नाही. सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन एकमताने निवडणूक लढविली जाईल. एकच उमेदवार राहील.
आ. विकास ठाकरे
शहर अध्यक्ष, काँग्रेस
भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीतील पराभवाची छाया
उपमहापौर पदासाठी उमेदवार निश्चित करताना भाजपात रस्सीखेच झाली. वर्षा ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली झाली होती. परंतु काही नेत्यांनी जातीय समीकरण मांडत पदवीधर निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा उपस्थित करून दबाव निर्माण करून पूर्व नागपुरातील वर्षा धावडे यांचे नाव निश्चित केले. कामाचा विचार करून संधी दिली जात नसल्याने आगामी निवडणुकीत याचा पक्षाला फटका बसू शकतो, अशी भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केली.