वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमात होणार बदल आशिष दुबे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून ‘जीएसटी’चे सिद्धांत व इतिहास शिकविण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. साधारणत: १५ जुलैपर्यंत अभ्यासक्रम तयार होईल व २० जुलैपर्यंत विद्यापीठाला सोपविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार देशात ‘जीएसटी’ लागू करण्याची घोषणा झाल्यानंतरच विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाने याला अभ्यासक्रमात सहभागी करायची तयारी सुरू केली होती. यासाठी अभ्यास मंडळातील २० सदस्यांचे पथक तयार करण्यात आले होते. ‘जीएसटी’बाबत जास्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध साप्ताहिके, वर्तमानपत्र, शासनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करण्यात येत आहे. सोबतच ज्या देशांमध्ये ‘जीएसटी’ लागू आहे, तेथील करप्रणालीची माहिती घेण्यात येत आहे. यात ‘न्यूझीलँड’च्या करप्रणालीवर विशेष जोर देण्यात येत आहे. सोबतच अमेरिका व ब्रिटनच्या करप्रणाली तसेच तेथील प्रकाशित पुस्तकांचा अभ्यास करण्यात येत आहे.
‘जीएसटी’ आता अभ्यासक्रमातही
By admin | Published: July 09, 2017 1:37 AM