लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करचोरीच्या संशयावरून जीएसटी अन्वेषण विभागाच्या १२ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील मूनलाईट फोटो स्टुडिओच्या तळमाळ्यावर धाड टाकून कोट्यवधींच्या अवैध व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.करचोरीच्या संशयावरून अन्वेषण विभागाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओवर नजर ठेवून होते. विभागाच्या सूत्राने सांगितले की, करचोरीच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दुपारपासूनच शोरूमची तपासणी सुरू केली. यादरम्यान शटर बंद करून शोरुममध्ये ग्राहकांना ये-जा करण्यावर प्रतिबंध लावले होते. मध्यभारतात सर्वात मोठ्या फोटोग्राफी मॉलमध्ये मूनलाईट स्टुडिओची ओळख आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसह कॅमेऱ्याचा व्यवसाय करण्यात येतो. नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे आणि प्रोजेक्टरचे डीलर आहे.जीएसटी चोरीची प्रकरणे पाहता विभागाने कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. करचोरीच्या विरोधात जीएसटीच्या अन्वेषण विंगतर्फे व्यावसायिकांवर निरंतर कारवाई करण्यात येत आहे. बिलाविना जास्त किमतीच्या वस्तुंची विक्री करून जीएसटीची चोरी करण्यात येत असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झालेला आहे. चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांत जवळपास ४५ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.