गुडिया शाहू दयेस पात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:48 PM2018-08-06T23:48:53+5:302018-08-06T23:49:43+5:30
उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू ही कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू ही कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी काही दिवसांपूर्वी गुडियाचे जामिनासंदर्भातील अपील फेटाळून लावले. त्या निर्णयामध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गुडिया गर्भवती महिला आहे, या केवळ एका कारणामुळे तिच्यावर दया दाखविली जाऊ शकत नाही. उषा कांबळे व त्यांची दीड वर्षीय चिमुकली नात राशी यांचा निर्घृण खून झाला असून हा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. घटना घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला हे दाखविणारे भरपूर दस्तावेज रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. ते लक्षात घेता या गुन्ह्यामध्ये गुडियाचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता नाकारत येत नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. सत्र न्यायालयाने गुडियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. या प्रकरणात गुडियाचा पती गणेश शाहू मुख्य आरोपी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांचा भिसीच्या सात हजार रुपयांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. तसेच, दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत.