लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमाना वॉरंटी अन् गॅरंटीचा आहे. एकदाची गॅरंटी संपली की वस्तू भंगारात जाते. बरेचदा तर ती संपण्यापूर्वीच वस्तूची वाट लागते. पण नागपुरात १९३४मध्ये तयार झालेले कुलूप आपली २५ वर्षांची गॅरंटी पूर्ण करून ८७ वर्षांनंतर आजही अव्याहतपणे सेवा देत आहे. ग्राहकांच्या समाधानाला पात्र ठरणाऱ्या अशा ‘व्यवसायाची चावी’ स्थानिक नव उद्योजकांनी शोधली तर नागपूरचा डंका सातासमुद्रापार पोहोचू शकतो, हे मात्र खरे !
नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या सेमिनरी हिल्स परिसरातील लुर्दमाता मंदिराच्या द्वारावर लागलेल्या या पितळी कुलूपाने ही आकांक्षा जागविण्याचे काम केले आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांना मंगळवारी सकाळच्या भटकंतीमध्ये या मंदिराच्या दारावर हे पितळी कुलूप दिसले. त्यावर इंग्रजीमध्ये काहीतरी अंकित असलेली दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी पाहिले असता जुलै-१९३४मध्ये तयार करण्यात आल्याची नोंद त्यावर दिसली. एवढेच नाही तर २५ वर्षांची गॅरंटी असल्याचेही त्यावर नमूद होते. आठ लिव्हरचे हे कुलूप आर. सी. वर्क शॉप, नागपूर सी. पी. येथे तयार करण्यात आल्याचाही उल्लेख यावर आहे. कुलूप तयार करणाऱ्या कंपनीचे दिलेल्या गॅरंटीपेक्षा अधिक काळ त्याची सेवा सुरू असल्याने त्याच्या गुणवत्तेला अधिक महत्व आले आहे.
वजन दीड किलोचे
सुमारे दीड ते पाऊणेदोन किलो वजनाचे हे कुलूप असून, ६ इंच आकाराचे आहे. पूर्णत: पितळ या धातूने तयार केलेल्या या कुलुपाची कडी जाडजूड लोखंडी सळईपासून बनविलेली आहे. चावी लावण्यासाठी असलेल्या जागेवरही पितळेचा अडसर लावून पूर्णत: सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे.
नागपुरातील पंचतारांकित एमआयडीसी देशात प्रसिद्ध आहे. येथे मिहानसारखा प्रकल्प येऊ पाहात आहे. याच मातीमध्ये ८०-९० वर्षांपूर्वी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हायची. ती या कुलुपाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. उत्पादनाआधीच कंपन्या बंद पडणाऱ्या या काळात उद्योजकांना पाठबळ मिळाले आणि उद्योजकांनीही गुणवत्ता जोपासली तर नागपूरच्या उद्योगनगरीचे नवे पर्व सुरू व्हायला वेळ लागणार नाही.
- ज्ञानेश्वर रक्षक, सदस्य, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स
...