नागपूर : आघाडी सरकारच्या काळात गेली साडेचार वर्षे जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणून काम केले. निवडणुकीच्या तोंडावर तीन चार महिन्यांसाठी डॉ. नितीन राऊत यांना संधी मिळाली. युती सरकारने मात्र नागपूर जन्मभूमी असलेल्या नेत्याला येथेच कर्मभूमीही बनविण्याची संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात नागपूरला स्वजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास तर मदत होईलच पण पक्ष संघटनेत महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या नेत्याला संधी मिळाल्यामुळे भाजपलाही याचा फायदा होणार आहे. पालकमंत्री हे जिल्हा पातळीवरील विविध समित्यांचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरील समित्या नेमण्याचे अधिकार त्यांना असतात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचेही अध्यक्षपद त्यांच्याकडे असते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात नागपुरातील व्यक्तीलाच पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे आता जिल्हा पातळीवर विविध बैठका, निर्णय त्वरित घेण्यास मदत होणार असून विकासालाही चालना मिळेल. शिवाजीराव मोघे पालकमंत्री असताना त्यांना नागपूरसह आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्यावे लागत होते. त्यांचा अधिक वेळ यवतमाळमध्ये जायचा. आता बावनकुळे गृह जिल्ह्याचेच पालकमंत्री झाल्यामुळे त्यांना मतदारसंघासोबतच पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांनाही मिळणार पालकत्व बावनकुळे यांच्या पालकमंत्रिपदाचा जिल्ह्याला जसा फायदा होईल, तसाच भाजपलाही फायदा होईल. आघाडी सरकारच्या काळात महामंडळे तर सोडाच पण साध्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखील शंभर टक्के नियुक्त्या होऊ शकल्या नाहीत. शिवाजीराव मोघे पालकमंत्री म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना पाहिजे तसा न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता कमजोर झाला व पर्यार्याने पक्षाला उतरती कळा लागली. बावनकुळे यांनी पक्षसंघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची हे त्यांना चांगलेच ठावूक आहे. जिल्हा व तालुका पातळीवर सर्व महत्त्वाच्या समित्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी बावनकुळे जोर लावतील यात शंका नाही. त्यामुळे भाजपची तादक वाढण्यासही मदत होणार आहे.
बावनकुळेंच्या रूपात स्वजिल्ह्यातील पालकमंत्री
By admin | Published: December 27, 2014 3:02 AM