नागपूरः पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस जवानांवर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी जखमी जवानांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
गडचिरोली येथील ग्यारापत्ती जंगलात नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यात नक्षलवादी कमांडर ठार झाला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील ही उल्लेखनीय कामगिरी ठरली. यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे, असा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.
-अमरावतीसह राज्यात परिस्थिती नियंत्रणात
संवेदनशील शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यातील काही शहरांमध्ये जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला याची सखोल चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपने काढलेल्या मोर्चावर पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील. नियम सर्वांनीच पाळायचे असतात. जमावबंदीमध्ये मोर्चे काढणे योग्य नाही.
-गडचिरोलीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
गडचिरोली जिल्ह्यातच उच्च दर्जाच्या आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यातील पोलीस हॉस्पिटलमध्येही अद्ययावत सोयी उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गडचिरोली येथील सुरजागड कोळसा खाणीला विरोध होत आहे. मात्र, या खाणीतून हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी ते आवश्यक आहे. मोठे उद्योग आले तर लोकांना रोजगार मिळेल. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शैक्षणिक, आरोग्याच्या सोयी व रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे, असेही शिंदे म्हणाले.