नागपूर : दैवीय शक्ती लाभलेल्या गानसम्राज्ञी आज आपल्यामध्ये नाहीत, याचे शल्य आहे. परंतु, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून लता मंगेशकर अजरामर राहतील. राज्य शासनाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो”, असे भावनिक वक्तव्य नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीला उजाळा दिला. यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, रणजीत देशमुख, डॉ. आशिष देशमुख यांची उपस्थिती होती.
“लता दीदी आज आपल्यात नाहीत याचे अपार दु:ख आहे. आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली. सर्वच भाषांमधून सुरेल गाणी गाऊन त्यांनी देशाची एकात्मता व अखंडता टिकविण्यात मोलाची कामगिरी बजावली. संगीत क्षेत्रात त्यांनी एकछत्री राज्य केलं. रणजीतबाबू देशमुख यांचे राजकीय गुरु व माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी. साळवे यांच्याशी त्यांचे नाते बहिणीचे होते. त्यामुळे रणजीतबाबू व त्यांच्या कुटुंबाशी देखील त्यांचा स्नेहभाव होता.
रणजीतबाबूंवर व्यक्तिगत लोभ असल्यामुळे लता दीदींनी त्यांच्या नावाने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांना संमती दिली होती. म्हणूनच ३२ वर्षांपूर्वी लता मंगेशकर हॉस्पिटल या नावाने नागपूर येथे त्यांच्या संस्थेतर्फे भव्य रुग्णालय सुरू करण्यात आले. लता मंगेशकर हॉस्पिटल गरजूंसाठी वरदान असून एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले असल्यामुळे या संस्थेला विशेष महत्व असल्याचे राऊत म्हणाले.
”परमेश्वरीय देण असलेल्या लता दीदींच्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. त्या या जगात नाहीत, याचे अपार दु:ख आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलची सेवा भविष्यातसुद्धा समर्पित भावनेने अविरत सुरु राहील.” असे भाव लता मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, स्वर व ताल याचा अचूक मेळ म्हणजे लता दीदी. सरस्वतीच्या रूपाने त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता. बाळाच्या काळजाप्रमाणे निर्मळ आवाज लाभलेल्या लता दीदींना लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे जी चांगली सेवा मिळत आहे, तीच खरी श्रद्धांजली आहे. लता मंगेशकर अमर असून या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचे नाव चमकत राहील, असेही ते म्हणाले.