लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ होतो. साडेतीन मुहुर्तापैकी एक संपूर्ण मुहुर्त असलेल्या गुढीपाडव्याला कोणतीही घटिका शुभ असते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हाच दिवस म्हून हा दिवस वर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाचे अथवा वासंतिकदेवीचे नवरात्र याच दिवसा पासून सुरू होते. बुधवारी २५ मार्च रोजी गुढीपाडवा येत आहे. सूर्योदय सकाळी ६.२३ वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी ६.३२ वाजताचा आहे. या काळात सूर्य मीन राशीतून भ्रमण करणार असून, सूर्योदयासमयी गुढी उभारावी असे शास्त्र सांगते. त्यामुळे, गुढी उभारण्यासाठीचा सर्वोत्तम असा मुहुर्त म्हणजे सकाळी ६.३० ते ९.३० वाजतापर्यंतचा असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. यावेळी चंद्र मीन राशीत रेवती नक्षत्रात असून तो १५ कला आणि ४१ विकला वरून भ्रमण करेल. तसेच यावेळी धनू राशीतून भ्रमण करणाऱ्या गुरूचा शुभप्रभाव वातावरणात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. यादिवशी राहूकाल दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत आहे. सकाळी गुढी उभारल्यानंतर ब्रह्मवृंदासह गुरु आणि देवाचे पूजन करावे. नवीन पंचांग आणून त्यावर असलेल्या गणपतीच्या फोटोचे पूजन करावे, असे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे.
गुढी उभारू सूर्योदयी; सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ६.३० ते ९.३० चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 4:42 PM